कामावरून कर्मचाऱ्यांना कमी करताना या सीईओला अश्रू अनावर

खासगी कंपन्यातून होत असलेली कर्मचारी कपात कुणालाच नवीन नाही. करोना काळानंतर कधी, कुठल्या वेळी एखाद्याला नोकरीवरून कमी केले जाईल याची खात्री देता येत नाही. अनेक कंपन्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता सुद्धा कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. एका कंपनीने नुकतेच काही कर्मचारी नोकरीवरून कमी केले पण त्यामुळे कंपनीचा सीईओ एकदमच चर्चेत आला आहे.

या सीईओने त्याला कर्मचारी कपात करताना नक्की काय वाटले हे दर्शविणारी सेल्फी लीन्कडेन वरून पोस्ट केली आहे. त्यात हा सीईओ चक्क रडताना दिसतो आहे. ही सेल्फी वेगाने जगभर व्हायरल झाली असून ‘क्राइंग सेल्फी’ म्हणून प्रसिद्ध झाली आहे. अर्थात या मुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. काही लोकांनी या सीईओचे कौतुक केले आहे तर काही लोकांनी त्याची घोर निंदा केली आहे.

हायपरसोशल नावाच्या या कंपनीच्या सीईओचे नाव आहे ब्रॅडेन वालेक. सेल्फी बरोबर लिहिलेल्या पोस्ट मध्ये तो म्हणतो,’ मला कंपनीतून काही कर्मचार्यांना काढून टाकावे लागले. त्याचे फार दुःख होतेय. पण माझी मजबुरी आहे. ही माझी सर्वात कमजोर बाजू मी शेअर करू शकणार नाही. गेल्या काही आठवड्यात मी लिंकडेनवर अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे पहिले आहे. बिघडलेले अर्थचक्र आणि अन्य काही कारणे त्यामागे आहेत. माझी एक चूक म्हणजे मी फेब्रुवारी मध्ये मुख्य सेवा विक्री बंद केली आणि नव्या सेवा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ही वेळ आली.’

वालेक पुढे म्हणतो, सर्व सीईओ कठोर नसतात. अनेक सीईओ त्यांच्या कर्मचारी सहकाऱ्यांवर प्रेम करणारे असतात हेच मला सांगायचे आहे.