खोटे वादे करण्यापेक्षा हार मंजूर- ऋषी सुनक

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार ऋषी सुनक सध्या निवडणुकीत थोडे मागे पडलेले दिसत आहेत. मात्र त्यांनी जनतेला खोटी आश्वासने देणार नाही असे स्पष्ट केले असून खोटे वादे करण्यापेक्षा पराभव मंजूर असल्याचे बीबीसीच्या मुलाखतीत सांगितले आहे. ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अर्थमंत्री असताना ज्या योजना राबविल्या त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र त्याच योजनांवर आपण अजूनही ठाम आहोत आणि निवडणूक जिंकण्यासाठी जनतेशी कोणतेही खोटे वादे करणार नाही मग भले निवडणुकीत पराभव झाला तरी तो मान्य करेन असे सुनक म्हणाले.

सुनक आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी लीज ट्रस सध्या आमनेसामने वादविवाद करत आहेत. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे जे सदस्य मतदान करणार आहेत, ते या दोघा उमेदवारांना प्रश्न विचारात आहेत. ट्रस यांनी करकपात करण्याचा वादा केला आहे मात्र सुनक यांनी आर्थिक दृष्टया मागास परिवारांच्या हिताचे काम करण्यास कटिबध्द आहे पण खोटे वादे करणार नाही असे उत्तर दिले आहे. ते म्हणाले करकपातीचा फायदा मुठभर श्रीमंतानाच होणार आहे पण समाजाच्या ज्या वर्गाला खरोखर गरज आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.

सुनक यांनी यावेळी त्यांनी कोविड लॉकडाऊन काळात केलेले कार्य लोकांनी पाहावे आणि त्यावरून माझी परीक्षा करावी असेही आवाहन केले. पंतप्रधान पदी निवड झाली तर हेच धोरण पुढे राबविले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. महागाई हि सध्या मोठी चिंता आहे हे मान्य करताना त्यांनी वीज बिले हा अधिक अडचणीचा विषय आहे असे सांगितले. ते म्हणाले, या संदर्भात खरोखरच ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी नक्कीच उपाययोजना केली जाईल.