स्वातंत्रदिनी प्रथमच लाल किल्ल्यावर स्वदेशी होवित्झर तोफांची सलामी

देश अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिवस साजरा करत असताना यंदा प्रथमच लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी मेक इन इंडिया अंतर्गत बनलेल्या स्वदेशी होवित्झर तोफातून दिली जाणार आहे. अॅडव्हान्स्ड टॉड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) प्रोटोटाईप त्यासाठी वापरल्या जाणार आहेत. यामुळे देशाची संरक्षण विभागात वाढलेली क्षमता दाखविली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने पारंपारिक ब्रिटीश तोफांचा वापर करतानाच डीआरडीओने डिझाईन केलेल्या आणि विकसीत केलेल्या स्वदेशी एटीएजीएस चा वापर तोफा सलामी साठी करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

स्वातंत्रदिन ध्वजरोहण समारंभासाठी यावेळी विशेष निमंत्रणे दिली गेली आहेत. देशातील सर्व जिल्ह्यातील एनसीसी कॅडेट भारताच्या नकाशाचे मानचिन्ह ज्ञानपथावर तयार करणार आहेत. स्थानिक वेशभूषेत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा संदेश त्यातून दिला जाणार आहे. त्याचबरोबर समाजात दुर्लक्षित राहिलेल्या आंगणवाडी कार्यकर्त्या, रेह्डीपटरीवाले, शवगृह कर्मचारी यांना विशेष निमंत्रणे दिली गेली आहेत.

९ ते १७ ऑगस्ट या काळात राबविल्या जात असलेल्या विशेष युवा आदान प्रदान कार्यक्रमातून १४ देशातून २६ अधिकारी आणि १२७ विद्यार्थी भारतात आले आहेत. ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.