ऋषभ पंत बनला उत्तराखंडचा सदिच्छा दूत

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याची उत्तराखंड राज्याचा सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ट्वीट केले असून गुरुवारी ऋषभचा धामी यांच्या हस्ते उत्तराखंड सदनात सन्मान केला जाणार आहे. राज्यातील युवा आणि जनस्वास्थ प्रोत्साहन देण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल असे धामी यांनी म्हटले आहे.

ऋषभ मुळात उत्तराखंड राज्याचाच हरिद्वारचा रहिवासी आहे. त्याचे शालेय शिक्षण रुरकी येथे झाले असून दिल्ली कडून तो रणजी सामने खेळला आहे. धामी ऋषभ बाबत ट्वीट करताना म्हणतात,’ देवभूमी उत्तराखंडचा सुपुत्र आणि टीम इंडियामधील प्रतिभावान खेळाडू ऋषभ पंत याला राज्याचा सदिच्छादूत नेमले गेले आहे. त्या निमित्ताने त्याला हार्दिक शुभेच्छा. केवळ २४ व्या वर्षीच ऋषभने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची क्षमता सिद्ध केली आहे.’

ऋषभ पंत पूर्वी त्याचा गुरु महेंद्रसिंग धोनी उत्तराखंडचा सदिच्छा दूत होता. ऋषभने क्रिकेट करियर मध्ये ३१ टेस्ट, २७ वनडे आणि ५४ टी २० मध्ये अनुक्रमे २१२३, ८४०, ८८३ धावा केल्या आहेत. वयाच्या २४ व्या वर्षीच त्याने टीम इंडियाची कप्तानी सांभाळली आहे. द. आफ्रिकेविरुद्ध पाच टी २० सामन्यात त्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. आयपीएल मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान होता.