उपराष्ट्रपती पदाची धनखड यांना राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे विजयी उमेदवार जगदीश धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज म्हणजे १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ मिनिटांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ देत आहेत. राष्ट्रपती भवनात हा समारोह होत आहे.

६ ऑगस्ट रोजी धनखड यांनी विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती. धनखड यांनी ७४.३६ टक्के मते मिळवून १९९७ नंतर झालेल्या ६ उपराष्ट्रपती निवडणुकात प्रथमच सर्वाधिक फरकाने विजय मिळविला आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती सुद्धा असतात. त्यामुळे आता धनखड यांच्या शपथविधीनंतर राज्यसभा आणि लोकसभेत म्हणजे दोन्हीकडे राजस्थानचे सभापती असतील.

जगदीश धनखड यांचा जन्म राजस्थानच्या झुंझुनु मध्ये १८ मे १९५१ रोजी झाला आहे. त्यांचे शालेय शिक्षण सैनिकी स्कूल मधून झाले असून त्यांनी पदार्थविज्ञानात पदवी आणि त्यानंतर एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. राजस्थानातील प्रमुख वकील अशी त्यांची ओळख आहे. शिवाय त्यांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे. १९८९ मध्ये ते लोकसभेवर जनता दलाचे खासदार म्हणून निवडून गेले आणि तेव्हाच त्यांनी सामाजिक जीवनात प्रवेश केला. १९९० मध्ये ते राज्यमंत्री होते.