लॉर्डस वरील रवी शास्त्री, पिचाई आणि अंबानी फोटो झाला व्हायरल

टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री याने मंगळवारी लंडनच्या लॉर्डस मैदानावरील एक फोटो शेअर केला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे. या फोटोत रवी शास्त्री यांच्यासोबत रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अल्फाबेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई दिसत आहेत. यावरून चर्चेला एकच उधाण आले असून ‘द हंड्रेड’ मध्ये कार्पोरेट गुंतवणूक होत असल्याचे अंदाज केले जात आहेत. ‘द हंड्रेड’ ही इंग्लंड मधील इनोव्हेटिव्ह क्रिकेट लीग असून त्यात एका इनिंग मध्ये १०० बॉल टाकले जातात. या लीगच्या दुसऱ्या सिझनसाठी शास्त्री युके साठी कॉमेंट्री करत आहेत. यंदाची स्पर्धा ३ ऑगस्ट ला सुरु झाली असून ३ सप्टेंबरला लॉर्डस वर अंतिम सामना होणार आहे.

शास्त्री यांनी फोटो खाली ‘जे क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात अश्या शानदार लोकांचा सहवास, मुकेश अंबानी, सुंदर पिचाई’ असे म्हटले आहे. या खेळात प्रत्येक टीम कडून १०० बॉल टाकले जातात, टी २० मध्ये १२० बॉल असतात. एक गोलंदाज सलग ५,१० चेंडू टाकू शकतो आणि जास्तीत जास्त २० बॉल एका गोलंदाजाला टाकता येतात. सुरवातीलाच २५ बॉलचा पॉवरप्ले होतो.सर्वाधिक रन्स करणारा संघ जिंकतो. यात एक पुरुष आणि एक महिला स्पर्धा आहे. सात शहरात आठ टीम ३२ सामने खेळतात.

रिलायंसकडे अगोदरच तीन देशांच्या टी २० टीमची मालकी आहे. भारताची आयपीएल, युएईची टी २० लीग आणि क्रिकेट साउथ आफ्रिका टी २०. सुंदर पिचाई यांना क्रिकेटची लहानपणापासून आवड आहे . विशेष म्हणजे गुगल आणि रिलायंस यांचे क्रिकेट बाहेरही व्यावसायिक नाते आहे. गुगलने रिलायंस जिओ मध्ये ७.७ टक्के भागीदारी घेतली आहे. त्यासाठी ३३७३७ कोटी गुंतवले गेले आहेत.