दुबईतील विशाल हिंदू मंदिराचे दसऱ्याला उदघाटन

युएईच्या दुबई येथील भव्य हिंदू मंदिराचे काम पूर्णावस्थेला गेले असून येत्या दसऱ्याला म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी या मंदिराचे उदघाटन होणार आहे असे जाहीर झाले आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी हे मंदिर ५ ऑक्टोबर पासून खुले होणार आहे. या मंदिरात १६ देवी देवतांच्या मूर्ती असून एक ज्ञान कक्ष, कम्युनिटी हॉल आहे. झेबलआली मध्ये अमिरातीच्या कॉरीडॉर ऑफ टॉलरन्स मध्ये हे मंदिर आहे. या भागात पूर्वीच गुरुद्वारा, हिंदू मंदिर आणि अनेक चर्चेस आहेत. नव्या हिंदू मंदिराच्या उदघाटन समारंभाला युएई सरकारी अधिकारी आणि अन्य प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

या मंदिरात पूजा, अनुष्ठाने करता येणार आहेत. सोशल मिडियावर कट्टरपंथीयांनी या समारंभाला विरोध केला आहे तर हिंदू समुदायाने मंदिराची तारीफ केली आहे. दोन भागात हे मंदिर खुले होणार आहे. प्रथम फक्त प्रार्थनास्थळ खुले होईल आणि दुसरा भाग मकरसंक्रांति दिवशी सुरु केला जाईल. ज्ञानकक्ष आणि कम्युनिटी हॉल तेव्हा खुला होणार आहे.

या मंदिरात लग्न, हवन व अन्य खासगी कार्यक्रम करता येतील असे सांगितले जात आहे. सकाळी ६ ते रात्री ९ अशी मंदिराची वेळ असून एकाचवेळी हजार ते १२०० भाविक एकाचवेळी येथे पूजा करू शकतील. क्यूआर कोडच्या सहाय्याने भाविक सुरक्षा आधारित स्लॉट बुकिंग सिस्टीम येथे लावली गेली असून तो कोविड १९ प्रोटोकॉलचाही एक भाग आहे. दिवाळी आणि नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम आयोजित होणार आहेत.