स्वदेशी तेजस लढाऊ विमान-जगातील अनेक देशांना रस

भारताचे स्वदेशी हलके लढाऊ विमान  तेजस जगात धमाल करत आहे. अमेरिकेसह अनेक बड्या देशांनी तेजस मध्ये रस घेतला असून या पिढीच्या सर्व लढाऊ विमानात तेजस सरस ठरले आहे. मलेशियाने १८ तेजस विमान खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यामुळे भारताचा उत्साह वाढला आहे.

शुक्रवारी संसदेत संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलिपिन्ससह आर्जेन्टिना, इजिप्त या देशांनी तेजसमध्ये रस दाखविला आहे. हे एक इंजिनवाले बहुउद्देशीय लढाऊ विमान कोणत्याही हवामानात उत्तम कामगिरी बजावण्यास सक्षम आहे. भारतीय हवाई दलाने ४८००० कोटींचा करार एचएएलशी केला असून ८३ तेजस विमाने खरेदी केली जात आहेत. २०२३ पासून या विमानांची डिलिव्हरी दिली जाणार आहे.  मलेशिया त्यांच्या जुन्या मिग २९ विमानांना काढून तेजस घेणार आहे.

अन्य लढाऊ विमानांच्या तुलनेत वजनाला हलके तरीही मजबूत असे तेजस, अधिक ताकदवान आहे. याचे ५० टक्के सुटे भाग भारतातच बनतात. १८ वर्षांच्या संशोधनातून तयार झालेल्या तेजसचे पहिले उड्डाण जानेवारी २००१ मध्ये झाले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनीच २००३ मध्ये या विमानाचे नामकरण ‘तेजस’ असे केले. तेजस हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ चमक असा आहे.

तेजसची अन्य वैशिष्टे म्हणजे ते अवघ्या ४६० मीटरच्या रनवे वर टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. त्यामुळे दुर्गम भागात सुद्धा ते सहज उतरविता येते. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर ते मारा करू शकते आणि कोणत्याही हवामानात काम करते. त्यावर इस्रायलचे ईएल/ एम- २०५२ रडार लावले गेले आहे. त्यामुळे एकाच वेळी १० लक्ष्ये ट्रॅक करून ते निशाणा साधू शकते. ८०० ते ९०० टन वजन वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. त्यातून शस्त्रे आणि मिसाईल्स नेता येतात. ५२ हजार फुट उंचीवरून ते १.६ मॅक वेगाने जाते आणि शत्रूच्या रडार ला सहज चकमा देऊ शकते. या विमानात हवेतच इंधन भरण्याची सोय आहे.