टेनिस सम्राज्ञी सेरेना विलियम्सचा टेनिसला रामराम
अमेरिकेची दिग्गज टेनिस खेळाडू सेरेना विलियम्सने टेनिसला रामराम करत असल्याचे संकेत दिले आहेत. २३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेनाने एका मासिकात लिहिलेल्या लेखात सेरेना म्हणते, ‘ या महिन्यात मी ४१ वर्षांची होत आहे. निवृत्ती किंवा संन्यास हे शब्द मला आवडत नाहीत. पण अन्य गोष्टींसाठी वेळ द्यायला हवा याची जाणीव आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर टेनिस शिवाय अन्य बाबींमध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष देणे या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. व्यावसायिक हित पाहताना दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा विचार करते आहे.’
सेरेना सध्या अमेरिकन ओपनची तयारी करण्यासाठी टोरांटोच्या नॅशनल बँक ओपन टेनिस टूर्नामेंट खेळते आहे. अमेरिकन ओपन मध्ये ती शेवटची खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर सेरेना म्हणते, मी टेनिसचा आनंद घेते पण आता उलटी गिनती सुरु झाली आहे. आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा वेगळ्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. ही वेळ कठीणच असते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वात आवडत्या गोष्टीपासून दूर जाणार असता तेव्हा तर ती अधिकच कठीण होते.