देशातील १ हजार शहरात ५ जी सेवा देण्यास जिओ सज्ज

रिलायंस जिओने देशातील एक हजार शहरांना फाईव्ह जी सेवा पुरविण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी तयार केलेली फाईव्ह जी दूरसंचार उपकरणे पूर्णपणे स्वदेशात विकसित केली गेली आहेत. या उपकरणांचे टेस्टिंग पूर्ण झाले आहे. रिलायंस इंडस्ट्री लिमिटेडच्या वार्षिक रिपोर्ट २०२१-२२ मध्ये संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानासह फाईव्ह जी साठी कंपनी पुढे वाटचालीस सज्ज असल्याचे नमूद केले गेले आहे.

देशात फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या नुकत्याच झालेल्या लिलावात रिलायंस जिओने सर्वात मोठी बोली लावली होती. दीड लाख कोटींच्या या लिलाव रकमेत रिलायंसने ८८०७८ कोटींचा स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. देशात १ हजार शहरात फाईव्ह जी सेवा देण्याची योजना पूर्ण झाली असून हिट मॅप, थ्रीडी मॅप, रे ट्रेसिंग टेक्नोलॉजीचा वापर करून ग्राहकात होणारा खप, महसूल याचा आधार त्यासाठी घेतला गेला आहे. याच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑग्मेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, क्लाऊड गेमिंग, टीव्ही स्ट्रीमिंग, सबंधित हॉस्पिटल्स, औद्योगिक उपयोग यांचेही टेस्टिंग झाले असल्याचे सांगितले जात आहे.