‘धनुष्यबाण’ रेस मध्ये एकनाथ शिंदे यांची आघाडी?
महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ विस्तार केला जात असताना मंगळवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ साठी सुरु असलेल्या रेस मध्ये एकनाथ शिंदे गटाने आघाडी घेतली असल्याची चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने सादर करायला सांगितलेली या संदर्भातील सर्व कागदपत्रे ८ ऑगस्टरोजी सादर केली आहेत तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे असे समजते.
शिवसेनेत उठाव केलेल्या शिंदे गटाने महाराष्ट्रात जून मध्ये भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. त्याचवेळी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी आहे आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाण आम्हाला मिळावे अशी मागणी केली होती. त्यासाठी शिंदे गटाने लोकसभा आणि राज्याच्या विधासभेत मिळालेल्या मान्यतेचा हवाला दिला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना निवडणूक चिन्ह ऑर्डर १९६८ च्या कॉलम १५ प्रमाणे या आमदार समर्थन पत्रासह आवश्यक कागदपत्रे ८ ऑगस्ट पूर्वी सादर करण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निवडणूक आयोगाला सदर प्रकरण न्यायालयाच्या विचाराधीन असल्याने तातडीने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत.