डोनाल्ड ट्रम्प यांच्या महालावर एफबीआयचे छापे
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिशान पाम हाउस व रिसोर्ट मार- ए- लिगो वर सोमवारी रात्री उशिरा, म्हणजे भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे अमेरिकी गुप्तचर तपास यंत्रणा एफबीआयने छापे घालून घराची झडती घेतली. या भागाला एफबीआयने संपूर्ण वेढा दिला असून ट्रम्प सध्या येथे नाहीत तर न्यूजर्सी येथे आहेत असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. ट्रम्प यांनी या छाप्याच्या वृत्तास पुष्टी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, आगामी अध्यक्षीय निवडणूक मी लढवू नये यासाठी ही कारवाई केली जात आहे.
फ्लोरिडा येथील मार-ए- लिगो एफबीआयने कब्जात घेतले आहे. येथे सध्या फक्त एफबीआयच आहे. अमेरिकी राष्ट्रपतींच्या बाबत असा प्रकार पूर्वी कधीच घडलेला नाही. तपास यंत्रणाना सहकार्य करून सुद्धा ही कारवाई केली गेल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्क टाईम्सला ट्रम्प यांच्या दोन मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही पूर्व नोटीस न देता ही कारवाई केली गेली. काही दिवसांपूर्वी ट्रम्प विरोधी ६ जानेवारीच्या हिंसा प्रकरणात पार्लमेंट कमिटीने तपास यंत्रणांनी अधिक वेगाने तपास केला पाहिजे असे विधान केले होते. व्हाईट हाउस मधून बाहेर पडताना ट्रम्प यांनी काही महत्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेली असे आरोप यापूर्वी केले गेले आहेत. तेव्हापासून गुप्तचर यंत्रणा ट्रम्प आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर नजर ठेऊन असल्याचे समजते.
ट्रम्प यांचे मार- ए –लिगो १७ एकर परिसरात पसरलेले असून येथे अलिशान हवेली, रिसोर्ट, क्लब हाउस आहे. ट्रम्प यांनी १९८५ साली या मालमत्तेची खरेदी केली आणि तिला अलिशान रूप दिले होते. येथे १२८ खोल्या,५८ बाथरूम, थियेटर, क्लब, स्पा अश्या सुविधा आहेत. ट्रम्प हा महाल भाड्याने वापरायला सुद्धा देतात आणि त्यातून दीड लाख डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न मिळवितात असे सांगितले जाते.