Maharashtra Coal Scam: दिल्ली न्यायालयाचा निर्णय- माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना ३ वर्षांची तर कंपनी संचालकांना ४ वर्षांची शिक्षा


मुंबई : महाराष्ट्रातील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने शिक्षा जाहीर केली आहे. न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना तीन वर्षांची तर कोळसा मंत्रालयातील माजी सहसचिव केएस क्रोफा यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी नागपूर येथील एका खासगी कंपनीच्या संचालकालाही तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

कोळसा वाटप घोटाळा
ट्रायल कोर्टाने ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिचे तत्कालीन संचालक मुकेश गुप्ता यांना गुन्हेगारी कट आणि फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला होता. या प्रकरणी गेल्या आठवड्यात सर्वांना दोषी ठरवण्यात आले होते.

यापूर्वी कोळसा खाण वाटप घोटाळ्यात सीबीआयने गुप्ता आणि क्रोफा यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याच वेळी, बचाव पक्षाच्या वकिलाने दोषींचे वृद्धत्व आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन या सर्वांना कमीत कमी शिक्षा करण्याचे आवाहन केले होते.

या प्रकरणात दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने ग्रेस इंडस्ट्रीज लिमिटेडने चुकीची माहिती देऊन कोळसा खाण वाटप मिळवले होते.

29 जुलै रोजी न्यायालयाने गुप्ता आणि क्रोफा या दोन्ही माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हेगारी कट, विश्वासभंग, फसवणूक आणि भ्रष्टाचार याप्रकरणी दोषी ठरवले होते. आजचा आदेश हा कोळसा घोटाळ्यातील 11 वा दोषी ठरला आहे.