क्रूरकर्मा हिटलरच्या घड्याळाला लिलावात ११ लाख डॉलर्सची किंमत

जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्या एका घड्याळाला अमेरिकेत लिलावात ११ लाख डॉलर्स किंमत मिळाली आहे. मेरिलँड मधील अलेक्झांडर हिस्टोरीकल ऑक्शन तर्फे या घड्याळाचा लिलाव केला गेला. घड्याळ घेणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर केले गेलेले नाही. जर्मन वॉच फर्म ह्युमर ने हे घड्याळ बनविले होते. हिटलरच्या ४४ व्या वाढदिवशी त्याला ते देण्यात आले होते. हे घड्याळ हिटलरचेच असल्याची खात्री अनेक तपासण्या करून केली गेली आहे.

४ मे १९४५ मध्ये फ्रांस सैनिकांच्या पथकाने हिटलरच्या  बर्गहॉज घरावर हल्ला केला होता तेव्हा हे घड्याळ लुटून नेले गेले होते. अमेरिकेत झालेल्या या लिलावात हिटलरच्या अन्य काही वस्तू सुद्धा ठेवल्या गेल्या होत्या. त्यात हिटलरची प्रेयसी इवा हिचा ड्रेस, हिटलरच्या अधिकार्यांचा सह्यांसह असलेला फोटो यांचा समावेश होता. या लिलावाला ज्यू समुदायाने कडक विरोध केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार या वस्तूंना ऐतिहासिक महत्व नाही. मात्र लिलावकर्त्यांनी दुसऱ्या महायुद्धातील अवशेष म्हणून हा लिलाव केल्याचे सांगितले आहे. हिटलरच्या घड्याळासाठी ३० ते ४० लाख डॉलर्स किंमत ठरविली गेली होती पण त्याला प्रत्यक्षात ११ लाख डॉलर्सच मिळाले.