असा आहे आगळा वेगळा तैवान

सध्या अमेरिका आणि चीन यांच्यातील राजनीतिक गोष्टींमुळे तैवान जगभर चर्चेत आला आहे. तैवानची अनेक आगळीवेगळी वैशिष्टे सांगता येतात. त्यातले पहिले म्हणजे या प्रांताने स्वतःला अजून स्वतंत्र घोषित केलेले नाही मात्र त्यांचा स्वतःचा ध्वज आहे, सेना आहे आणि सरकारही आहे. त्यामुळे तैवान कडे जग स्वतंत्र देश याच दृष्टीने पाहते. रात्रीचे बाजार, अतिशय मनमिळावू नागरिक आणि भक्कम अर्थव्यवस्था तैवानचे आणखी काही वैशिष्टे. येथील नागरिक स्वतःला चीनी कम्युनिस्ट म्हणवून घेणे पसंत करतात पण त्यांना चीनचे आधिपत्य मात्र मान्य नाही.

तैवान मध्ये कुठेही जा येथील नागरिक अतिशय मैत्रीपूर्ण व्यवहार करताना दिसतील मग ते स्वदेशी असोत वा परदेशी प्रवासी. राजधानी तैपई जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध असून येथे अनेक सुंदर इमारती आहेत. ‘तैपेई १०१’ ही इमारत पाहण्यासाठी पर्यटक प्रचंड गर्दी करतात. ही इमारत या शहराची ओळख बनली आहे. तैवान मधील प्राचीन नगरी पिग्शी मधील वार्षिक स्कायलँटर्न उत्सव पाहायला मोठी गर्दी जमते. ही चीनी परंपरा ३ ऱ्या शतकापासून सुरु झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारी मध्ये हा उत्सव होतो आणि तो पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गर्दी करतात.

येथील नाईट मार्केट ही एक वेगळीच धमाल जागा आहे. प्रत्येक शहरात अशी मार्केट असून त्यांची संख्या साधारण ३०० आहे. तैपई येथील ‘शिलीन नाईट मार्केट’ प्रसिद्ध असून येथे खाद्यपदार्थांचे असंख्य प्रकार मिळतात. येथील स्ट्रीट फूड अतिशय प्रसिद्ध असून तेथे देशी विदेशी नागरिकांची तुंबळ गर्दी असते.

१९६० पासून तैवानचा औद्योगिक विकास सुरु झाला असून हा विकास म्हणजे एक चमत्कार मानला जातो. तैवानची अर्थव्यवस्था उत्तम राहण्यात येथील सेमीकंडक्टर उत्पादन कंपनी ‘टीएसएमसी’चा मोठा वाटा आहे. इंटेल, क्वालकॉम, अॅपल, मायक्रोसोफ्ट, सोनी या कंपन्या या कंपनीच्या ग्राहक आहेत.