भारतातही बनणार आयफोन १४ ?

दिग्गज टेक कंपनी अॅपल त्यांच्या नव्या आयफोन १४ चे उत्पादन भारतात सुद्धा करेल असे संकेत दिले गेले आहेत. त्यामुळे प्रथमच भारत चीनला टक्कर देऊन नवा आयफोन लाँच झाल्याबरोबर त्यांचा पुरवठादार बनेल असे सांगितले जात आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये आयफोन १४ सिरीज सादर केली जाईल आणि त्या फोनची किंमत साधारण आयफोन १३ इतकीच असेल असेही म्हटले जात आहे.

चीन मध्ये जवळजवळ ९० टक्के अॅपल उत्पादने बनतात. पण चीनच्या झिरो कोविड नीतीमुळे या उत्पादनात अडचणी येत आहेत. त्याचा थेट परिणाम फोनच्या पुरवठ्यावर होत आहे. यामुळे अॅपलने भारतात उत्पादन वाढ करण्याची तयारी केली आहे. चीन नंतर भारत हीच अॅपलची पसंती आहे. सध्या देशात आयफोन ११,१२,१३ चे उत्पादन होत आहे. तैवानी कंपनी फॉक्सकॉनच्या प्लांट मध्ये भारतात उत्पादन केले जात आहे.

सध्याच्या काळात अॅपलचे भारतात दीड अब्ज डॉलर्स किमतीचे फोन विक्री होत आहेत त्यात ०.५ अब्ज पेक्षा कमी स्थानिक पातळीवर तयार होत आहेत. २०१८-१९ मध्ये चीनने २२० अब्ज डॉलर्स किंमतीचा माल तयार केला होता आणि त्यातील १८५ अब्ज डॉलर्स किंमतीच्या मालाची निर्यात केली होती. गतवर्षी भारतात ३.१ टक्के आयफोन तयार केले गेले होते यंदा हा आकडा ६ ते ७ टक्क्यांवर जाईल असे सांगितले जात आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत १० लाख मेक इन इंडिया फोन बाजारात विकले गेले त्यात आयफोन १२ आणि १३ ची संख्या जास्त होती असे आकडेवारी वरून दिसून येते.