एकनाथ शिंदे सरकारच्या निशाण्यावर माजी मंत्री अस्लम शेख, 1000 कोटींच्या बेकायदा स्टुडिओवर कारवाईचे आदेश


मुंबई : महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे. याशिवाय मुंबई जिल्हाधिकारी आणि बीएमसीला कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेख यांच्यावर मालवणीतील मढ-मार्वे भागात एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, अस्लम शेख यांनी पर्यावरणाचे नियमांचे उल्लंघन करुन बेकायदा स्टुडिओ बांधला होता. आता त्यांच्यावर कारवाईचे आदेश शासनाने दिले आहेत. किरीट सोमय्या यांच्या मते त्यांच्यावर लवकरच बुलडोझर चालू शकतो.

काय म्हणाले किरीट सोमय्या?
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अस्लम शेख मित्र परिवाराने मढ-मार्वे परिसरात समुद्रकिनारी एक हजार कोटी रुपयांचे बेकायदेशीर स्टुडिओ उभारले आहेत. जे पर्यावरणासाठी घातक ठरू शकते. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत या बेकायदा स्टुडिओंवर लवकरच बीएमसीचा बुलडोझर चालू शकतो.

अस्लम शेख यांनी घेतली फडणवीस यांची भेट
माजी कॅबिनेट मंत्री अस्लम शेख काही दिवसांपूर्वी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रत्यक्षात ते भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासोबत कारमधून जाताना दिसले. त्यानंतर त्यांनी कंबोज यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजले. या भेटीपासून अस्लम शेख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, या विषयावर त्यांच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

त्यादरम्यान असलम शेख यांच्यावरही ईडी कारवाई करू शकते, असेही बोलले जात होते. कदाचित त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली असावी. मात्र, आता अस्लम शेख यांनी 1000 कोटी रुपयांचे अवैध स्टुडिओ बनवून मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.