सहा राज्यांमध्ये वाढत आहेत कोरोनाची प्रकरणे, केंद्राने पत्र लिहून सांगितले तीन उपाय योजनांवर भर देण्यास


नवी दिल्ली – देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्रासह राज्य सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत या धोकादायक विषाणूच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पुन्हा एकदा दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून योग्य त्या उपाय योजना आणि सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. पत्रात, या सर्व राज्यांना लसीकरणाला गती देण्यास, पाच पट धोरणाचे अनुसरण करण्यास आणि कोविडच्या योग्य वर्तनाचे पालन करण्यास सांगितले आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 19,406 नवीन रुग्ण आढळले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 19,928 लोक बरेही झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, देशातील कोरोनाचा दैनंदिन संसर्ग दर 4.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,34,793 वर पोहोचली आहे. याशिवाय देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,26,649 वर पोहोचली आहे.