पत्रा चाळनंतर आता महाराष्ट्रातील अनेक मोठे घोटाळे ईडीच्या रडारवर, मागवली ठाकरेंच्या सरकार काळात झालेल्या घोटाळ्यांची कागदपत्रे


मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात चर्चेत असलेल्या पत्रा चाळ व्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय (ED) आणखी काही मोठ्या घोटाळ्यांची चौकशी करू शकते. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरती घोटाळ्यांची चौकशी आता ईडीकडून केली जाण्याची शक्यता आहे. तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून या प्रकरणांची कागदपत्रे मागवली आहेत. त्यामुळे आता या घोटाळ्यांचा पुढील तपास ईडी करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

ईडी करू शकते ठाकरे सरकारच्या कार्यकाळातील या घोटाळ्यांची चौकशी
पुणे पोलिसांनी म्हाडा, आरोग्य आणि टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आणला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही केली आहे. दरम्यान, ईडीने पुणे पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणांशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे पाठवली आहेत.

महाराष्ट्रातील म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरती घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी म्हाडाच्या पेपरफुटी घोटाळ्यात शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर या घोटाळ्यात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणांमध्ये मनी लाँड्रिंग तर झालेले नाही ना, याचीही चौकशी ईडी करणार आहे. सध्या ईडी या तीन घोटाळ्यांशी संबंधित कागदपत्रांची चौकशी करत आहे. जर ईडीला काही चुकीचे आढळले, तर ते मनी लाँडरिंग कायद्याखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू करेल आणि त्यानंतर या घोटाळ्यांमध्ये नवे वळण येऊ शकते.