राष्ट्रकुल स्पर्धा, भारतीय पहिलवानांनी तासात लुटली तीन सुवर्ण पदके

बर्मिघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये आठव्या दिवशी भारताच्या पैलवानांनी एका तासात प्रतिस्पर्ध्यांना चीत करून तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल मध्ये ८६ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनाम याला एकही संधी न देता ३-० अशी कामगिरी बजावत इनाम याला अस्मान दाखविले. विजयानंतर बोलताना दीपकने हे पदक त्यांच्यासाठी विशेष खास असल्याचे सांगितले. कारण मोहम्मद इनाम दीपकच्या तुलनेत अधिक अनुभवी आहे आणि त्याने यापूर्वी दोन वेळा कॉमन वेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे.

बजरंग पुनियाने सलग दुसरे सुर्वणपदक मिळविताना फ्रीस्टाईल प्रकारात ६५ किलो वजनी गटात कॅनडाच्या लाचलन मॅक्नीलला ९-२ ने हरविले. भारताला मिळालेले कुस्ती मधले हे पहिले गोल्ड मेडल होते. त्या पाठोपाठ साक्षी मलिकने प्रथमच सुवर्णपदकाची कमाई केली. तिने फ्री स्टाईल प्रकारात ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या एन्ना गोजालींजचा पराभव केला. भारताने या स्पर्धेत आत्तापर्यंत २६ पद्कांची कमाई केली आहे. त्यात ९ सुवर्ण, ८ रजत आणि ८ कांस्य पदके आहेत.