ब्लू ओरिजिन मधून सहा अंतराळवीरांनी केला यशस्वी प्रवास

अमेझोनचे संस्थापक आणि स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचे प्रमुख जेफ बेजोस यांच्या न्यू शेपर्ड स्पेस क्राफ्ट मधून गुरुवारी सहा अंतराळ प्रवाशांनी अंतराळ सफर केली. टेक्सास येथील लाँचिंग साईट वरून उड्डाण केलेल्या या रॉकेट मधून अंतराळवीर १०७ किमी उंचीवर जाऊन पॅराशूटच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले. हा प्रवास १० मिनिटे २० सेकंदाचा झाला. या रॉकेटने ताशी ३६०३ किमी वेगाने हा प्रवास केला.

या उड्डाणात नवीन जागतिक रेकॉर्डची नोंद झाली. यात प्रथमच इजिप्त आणि तुर्कस्तानचे प्रवासी होते. इजिप्तमधली इंजिनिअर सारा बाबरी अंतराळ सफर करणारी पहिली इजिप्शियन ठरली वर मारियो फेरेरा पहिला पोर्तुगाली ठरला. मारियो व्यावसायिक आहे. त्यांच्या सोबत युट्यूब चॅनल डूड परफेक्टचा सहसंस्थापक कोबी कॉटन, ब्रिटीश अमेरिकन गिर्यारोहक वेनेसा ओब्रायन, टेक लीडर क्लिंट केली थर्ड व टेलीकम्युनिकेशन एक्सिक्यूटिव्ह स्टीव यंग हे अन्य प्रवासी होते. या प्रवासात वापरले जाणारे कॅप्सूल आणि रॉकेट पुन्हा पुन्हा वापरता येतात. या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाला येणारा खर्च १.२५ दशलक्ष डॉलर म्हणजे साधारण १० कोटी रुपये आहे. या स्पेस क्राफ्टने आत्तापर्यंत सहा वेळा सुरक्षित प्रवास केला असून एकूण ३१ प्रवासी अंतराळ यात्रा करून आले आहेत.

गेल्या जुलै महिन्यात बेजोस समेत तीन प्रवाशांनी या अंतराळ यात्रेची सुरवात केली होती.