बलाढ्य चीनला टक्कर देणाऱ्या तैवान राष्ट्रपती साई इंग वेन

अमेरिकेच्या खासदार नॅन्सी पॅलॉस यांनी तैवानला भेट दिल्यामुळे चिडलेल्या चीनने तैवान सीमेवर युद्धसराव सुरु केला आहे. मात्र त्याला किंचितही भिक न घालता तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन ठाम राहिल्या आहेत. याच साई वेन यांच्या नेतृत्वाखाली तैवानने जगाला त्यांची सॉफ्टवेअर मधील ताकद दाखवून दिली आहेच पण त्यांच्या मायक्रोचिप्स उत्पादनावर आज सारे जग अवलंबून आहे. तैवानचे हे यशच चीनला खुपते आहे.

तैवानला आत्मविश्वास देणाऱ्या राष्ट्रपती साई वास्तविक एका सर्वसामान्य घरातील आहेत. त्यांचे वडील मोटार दुरुस्तीचे काम करत होते. साई यांनी कायदा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात शिक्षण घेतले आहे. अमेरिकेतील कर्नेल विद्यापीठातून आणि ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्स मधून त्यांचे शिक्षण झाले आहे. तैवान सरकारमध्ये त्यांनी प्रथम १९९३ मध्ये काम सुरु केले होते पण त्यावेळी त्या कोणत्याही राजकीय पक्षात नव्हत्या. २००० साली प्रेसिडेंट चेन शुई बेन यांनी त्यांना प्रथम मंत्रिमंडळात समाविष्ट केले तेव्हाही त्या कोणत्याच राजकीय पक्षात नव्हत्या. २००४ साली मात्र त्यांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव पक्ष जॉईन केला आणि त्यानंतर अनेक जबाबदारीची पदे भूषविली.

२०१६ मध्ये त्या याच पक्षाकडून राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवार बनल्या आणि प्रचंड बहुमत मिळवून त्यांनी सरकार स्थापन केले. त्याचवेळी त्यांनी एक इतिहास रचला. त्या तैवानच्या पहिल्या अविवाहित महिला राष्ट्रपती बनल्या. विशेष म्हणजे त्या अश्या पहिल्या राष्ट्रपती होत्या ज्या राजधानी तैपईच्या महापौर नव्हत्या. शिवाय आशियाई देशात राजकीय परिवाराची पार्श्वभूमी नसलेल्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

साई यांनी देशात अफाट लोकप्रियता मिळविलेली आहे. त्यामुळेच त्या दुसऱ्या वेळी सुद्धा मोठ्या बहुमताने राष्टपती म्हणून निवडल्या गेल्या. साई यांना मांजरे प्रिय आहेत. राष्टपती बनताच त्यांनी भाषणात त्या तीन गार्ड डॉग दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले होते. मांजरे आणि कुत्री एकत्र राहू शकत नाहीत असा समज आहे पण साई यांनी मांजरे आणि कुत्री एकत्र गुण्यागोविंदाने सांभाळून किमया केली आहे. त्यांनी देशात अनेक सुधारणा केल्या आणि देशात स्वातंत्रतेचे वातावरण निर्माण केले आहे.