या महिलेची नखे बसपेक्षा लांब, झाले गिनीज रेकॉर्ड

जगभरातील लोक काही ना काही हटके करून अनेक प्रकारचे रेकॉर्ड नोंदविण्याचे प्रयत्न करत असतात. अमेरिकेतील एका महिलेने नखे वाढवून जागतिक रेकॉर्ड केले आहे. तिच्या नखांची एकूण लांबी ४२ फुट १० इंच असून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये तिच्या या विक्रमाची नोंद झाल्याची घोषणा मंगळवारी केली गेली.

अमेरिकेच्या मिनीसोटा मध्ये राहणारी ६३ वर्षीय डायना आर्मस्ट्रॉंग हिच्या दोन्ही हाताच्या नखांची लांबी ४२ फुट १० इंच म्हणजे एकाद्या बस पेक्षा सुद्धा जास्त लांब आहे. तिने गेल्या २५ वर्षात नखे कापलेली नाहीत. या वर्षी मार्च मध्ये तिने हे रेकॉर्ड केले. १९९७ मध्ये तिने शेवटची नखे कापली होती.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार डायनाने नखे इतकी लांब वाढविण्यामागे तसेच कारण आहे. डायना सांगते, तिची मुलगी लतीशा १६ वर्षाची असताना दम्याच्या आजाराने वारली. लतिशा डायनाची नखे नेहमी कापून देत असे. अगदी मृत्यूच्या आदल्या दिवशी सुद्धा तिने आईची नखे कापून दिली होती. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून डायनाने नखे कापली नाहीत.

नखे वाढविणे डायना साठी मुळीच सोपे नाही. कारण नखे तुटू नयेत म्हणून तिने गाडी चालविणे सोडून दिले, खिडकीबाहेर हात काढणे सोडले आणि गेल्या कित्येक वर्षात सलूनना भेट दिली नाही. डायनाच्या नावावर गिनीज रेकॉर्ड होण्यापूर्वी हे रेकॉर्ड ज्याच्या नावावर होते त्यांच्या नखांची लांबी १८ फुट होती असे समजते.