देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्यात ही इलेक्ट्रिक वाहने अधिक
देशात दुचाकी आणि कार्सची विक्री समाधानकारक होत असली तरी इलेक्ट्रिक वाहन विक्रीत सर्वाधिक विकली जाणारी वाहने कार्स किंवा दुचाकी नसून तिचाकी वाहने आहेत असे आकडेवारी सांगते. अवजड उद्योग उपमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
रस्ते परीवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात १३,९२,२६५ इलेक्ट्रिक वाहने विकली गेली असून त्यात सर्वात जादा मागणी स्कूटर कार्सला नाही तर तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आहे. विक्री अहवालानुसार ३ ऑगस्ट पर्यंत झालेल्या विक्रीत ७,९३,३७० तीनचाकी, ५,४४,६४३ दुचाकी तर ५४,२५२ इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या आहेत. २०२१-२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन विक्री गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट वाढली आहे.
भारत सरकार इलेक्ट्रिक वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारची अनुदाने देत आहे. शिवाय पेट्रोल डीझेलची दरवाढ आणि पर्यावरण जागृती यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहेत. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे तसेच चार्जर आणि चार्जिंग स्टेशनवरील जीएसटी सुद्धा १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. शिवाय सरकारने सर्व राज्यांना एक अधिसूचना जारी करून इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्स माफ करावा असा सल्ला दिला आहे असे समजते.