अर्पिताच्या जिवाला तुरुंगात धोका- ईडीने न्यायालयात केला दावा
शिक्षण भरती घोटाळा प्रकरणातील अर्पिता मुखर्जी यांच्या जीवाला तुरुंगात धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांना देण्यात येणारे जेवण टेस्ट करून दिले जावे आणि त्यांच्या कोठडीजवळ २४ तास गार्ड नेमावा अशी मागणी ईडी कडून पीएमएलए न्यायालयात केली गेली आहे. पश्चिम बंगाल मधील शिक्षण भरती घोटाळ्यात ईडीने अटक केलेले मंत्री पार्थ चटर्जी आणि त्यांची सहयोगी अर्पिता यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे. त्यावेळी ईडीने न्यायाधीशांकडे वरील मागणी करून अर्पिता यांच्या कोठडीत चार पेक्षा जास्त कैदी असू नयेत अशी विनंती केली आहे.
पार्थ यांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत मिळाले नसल्याचे ईडी चे म्हणणे आहे. या दोघांना १४ दिवसांच्या रिमांड नंतर १८ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी साठी आणले जाणार आहे. अर्पिता यांच्या घरातून ज्या गोष्टी ईडीला मिळाल्या होत्या त्याच्या चौकशी साठी ईडीने न्यायालयाकडे रिमांड मागितला होता. चौकशी दरम्यान अर्पिताने काही नावे ईडी ला दिली आहेत. तिच्या बँक खात्यातून त्यापूर्वीच ईडीने ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. बेलघोरीया येथील फ्लॅटवर कोण पैसे आणून देत असे याची माहिती अर्पिताने दिल्यावर त्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे समजते.