RBI MPC Meet Updates : RBI ने रेपो रेट 0.50% ने वाढवला, जाणून घ्या किती वाढेल तुमच्या कर्जाचा EMI


नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने प्रमुख व्याजदर म्हणजेच रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.40 टक्के झाला आहे. 8 जून रोजी केलेल्या शेवटच्या धोरणाच्या घोषणेमध्ये, RBI ने रेपो दरात अर्धा टक्का वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला होता. अलीकडेच, यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह (यूएस फेड) ने देखील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आरबीआयही व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची माहिती दिली.

खूप वाढेल कर्जाचा हफ्ता
रेपो दरातील या वाढीचा बोजा बँका त्यांच्या ग्राहकांवर टाकतील. यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता वाढेल. गृहकर्जासोबतच वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचा हप्ताही वाढणार आहे. जर तुमचे गृहकर्ज 30 लाख रुपये असेल आणि कालावधी 20 वर्षांचा असेल, तर तुमचा हप्ता 24,168 रुपयांवरून 25,093 रुपयांपर्यंत वाढेल. कर्जावरील व्याजदर 7.5 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत वाढला, तर EMI वर नक्कीच फरक पडणार आहे.

काय आहे रेपो रेट
रेपो रेटला प्राइम व्याजदर असेही म्हणतात. रेपो रेट हा दर आहे, ज्या दराने व्यावसायिक बँका RBI कडून पैसे घेतात. जेव्हा बँकांसाठी कर्ज देणे महाग होते, तेव्हा त्या ग्राहकांना जास्त दराने कर्ज देतात. याचा सरळ अर्थ असा की रेपो रेट वाढल्यावर गृहकर्ज, कार लोन आणि वैयक्तिक कर्ज यांसारखी कर्जे महाग होतात. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही मोठ्या प्रमाणावर रेपो दराने ठरवले जाते. म्हणजेच जेव्हा रेपो दरात वाढ होते तेव्हा बँका एफडीवरील व्याजदर वाढवतात.

RBI का वाढवते रेपो रेट ?
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदर वाढवते. अशा प्रकारे RBI आर्थिक धोरण कडक करून मागणी नियंत्रित करण्याचे काम करते. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईत किरकोळ घट झाली आहे. अमेरिकेतील महागाई सध्या 40 वर्षांच्या उच्चांकावर आहे. ही महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्ह सातत्याने व्याजदर वाढवत आहे. विशेष म्हणजे, जेव्हा कोरोना विषाणूची महामारी आली तेव्हा जगभरातील मध्यवर्ती बँकांनी चलनविषयक धोरणात शिथिलता आणली होती आणि व्याजदरात लक्षणीय घट केली होती. आरबीआयने आधीच जाहीर केले आहे की ते हळूहळू आपली उदारमतवादी भूमिका मागे घेतील.

ही दरवाढ एका दशकातील सर्वाधिक दरवाढ
गृहकर्ज EMI देणाऱ्यांनी अधिक पैसे देण्याची तयारी करावी. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्जदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार ही वाढ एका दशकातील सर्वाधिक दरवाढ आहे.