भारतात फाईव्ह जी स्मार्टफोन विक्रीत तडाखेबंद वाढ

सायबर मिडिया रिसर्च सीएमअर क्यू २०२२चा समीक्षा रिपोर्ट नुकताच जारी केला गेला असून देशात २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत विकल्या गेलेल्या दर तीन स्मार्टफोन मध्ये १ फाईव्ह जी स्मार्टफोन असल्याचे म्हटले गेले आहे. याचाच अर्थ भारतात फाईव्ह जी स्मार्टफोन मार्केट अतिवेगाने विकसित होत आहे. अर्थात भारतात फाईव्ह जी सेवा अजून सुरु झालेली नाही मात्र त्यापूर्वीच फाईव्ह जी सपोर्ट करणारे स्मार्टफोन तडाख्याने विकले जात आहेत.

भारतात फाईव्ह जी फोन शिपमेंट मध्ये तिमाही ७ टक्के वाढ झाली असून दरसाल १६३ टक्के वाढ दिसली आहे. त्यात सॅमसंग २८ टक्के हिस्सा घेऊन आघाडीवर आहे. दोन नंबरवर विवो असून त्यांचा हिस्सा १५ टक्के आहे. भारतात या महिनाअखेर फाईव्ह जी सेवा सुरु होईल असे संकेत मिळत आहेत. ही सेवा सुरु झाली की स्मार्टफोन विक्री आणखी वेगाने वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बजेट फोन विभागात शाओमी, सॅमसंग आणि रिअलमी सामील असून शओमी ला सर्वाधिक म्हणजे २० टक्के मागणी आहे. सॅमसंगला १८ टक्के, रियलमीला १६ टक्के मागणी असून चार नंबरवर विवो आणि पाच नंबरवर ओप्पो आहेत. ७ हजार ते २५ हजार रेंज मधील फाईव्ह जी, पैसा वसूल फोन मागणीत १६० टक्के वाढ झाल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे.