आईसलँड मध्ये ६ हजार वर्षात दुसऱ्यांदा या ज्वालामुखीचा उद्रेक

आईसलँडची राजधानी रिक्जेविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून ६ हजार वर्षापूर्वीचा हा ज्वालामुखी दुसऱ्यावेळी भडकला आहे असे समजते. गतवर्षी २०२१ मध्ये सुमारे सहा महिने ज्वालामुखी धगधगत होता आणि आता हा दुसरा विस्फोट आहे. ही धगधग किती काळ राहील याचा अंदाज आत्ताच वर्तविता येणार नाही असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या क्षेत्रात गेला काही काळ भूकंप वाढले आहेत. त्यामुळे ज्वालामुखी उद्रेक झाला आहे. विवरातून लावा बाहेर येऊ लागल्यावरच ज्वालामुखीचा उद्रेक होणार याचा अंदाज आला होता. बुधवारी हा विस्फोट झाला. आईसलँडच्या हवामान विभागाने मिडियावर लाईव्ह फोटो शेअर केले आहेत. सहा महिन्यापूर्वी झालेल्या उद्रेकानंतर येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि प्रेक्षकांनी गर्दी केली होती. रिक्जेविक पासून ४० किमीवर माउंट फाग्रादल्सफजल जवळ मार्च ते सप्टेंबर असे सहा महिने लावा वाहत होता. नव्या उद्रेकामुळे हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही असे जाहीर केले गेले आहे.

आईसलँडमध्ये सुमारे ३२ ज्वालामुखी साखळी सक्रीय असून युरोपात ही संख्या सर्वाधिक आहे. दर पाच वर्षांनी येथे एका ज्वालामुखीचा उद्रेक होतो असे समजते.