बांगड्यांची नगरी फिरोजाबाद, दरवर्षी २५० कोटींची उलाढाल

महिला आणि बांगड्या यांचे नाते अतूट आहे. सणसमारंभ, श्रावण, माहेरी आलेल्या माहेरवाशिणी यांची पाठवणी बांगड्या भरून करण्याची प्रथा आजही पाळली जाते. स्त्रीमधील नाजूकपण, हळवेपण आणि थोडे भित्रेपण प्रतीत करणारी बांगडी पुरुषवर्गाला मर्दानगी दाखविण्याची संधी संधी देते. कुठेही हमरातुमरी सुरु झाली की’ आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत’ असे मोठ्या तोऱ्याने प्रतिस्पर्ध्याला ऐकविले जाते हे आपण अनेकदा पाहतो.

सर्व जाती धर्माच्या स्त्रिया, मुली मोठ्या कौतुकाने बांगड्या घालतात. फिरोजाबादची ओळख ‘सुहाग नगरी’ आणि ‘चुडियाँ नगरी’ अशी आहे. पण फिरोजाबाद हे या नगरीचे मूळ नाव मात्र नाही. ४५० वर्षांपूर्वी हे गाव चंद्रवार नावाने परिचित होते. मुघल सम्राट अकबरच्या काळात त्याचा एक सरदार फिरोज शाह याने १५६६ मध्ये त्याने या गावाचे नाव फिरोजाबाद केले. त्यावेळी भारतवर वारंवार आक्रमणे केली जात आणि आक्रमक त्यांच्या बरोबर काचेच्या वस्तू आणत. काचेच्या फुटलेल्या वस्तू वितळविण्यासाठी येथे ‘भैसा भट्टी’ नावाची भट्टी उभारली गेली होती. तेथे काचा वितळवून नवीन वस्तू बनविल्या जात होत्या.

सुमारे २०० वर्षांपूर्वी येथे काचेच्या बांगड्या बनविण्याचा उद्योग सुरु झाला आणि आजघडीला येथून ३५ देशात बांगड्या निर्यात केल्या जातात. गावात ९०-९५ बांगड्या बनविण्याचे कारखाने आहेत. त्यातून वर्षाला सरासरी २५० कोटींची उलाढाल होते. या कारखान्यांमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो.बांगड्या बनविण्याचे काही टप्पे आहेत. प्रथम लोखंडी पट्टीवर बांगड्या जोडणे, दिव्याच्या धगीवर बांगड्यांची दोन्ही टोके सांधणे, मग डिझाईन, गोल्ड वर्क, योग्य आकारानुसार त्यांची वर्गवारी आणि मग रंगकाम असे हे टप्पे आहेत.

४२ वर्षांपासून या व्यवसायात असलेले अश्विनीकुमार अँड को चे मालक सांगतात, पूर्वी बांगडी घालणे ही परंपरा होती. हातातील बांगड्या फुटेपर्यंत उतरविल्या जात नसत. बांगड्या भरण्यासाठी ठराविक कासार घरी येत असत. त्यांच्याकडून एक जादा बांगडी ‘ आशीर्वादाची’ म्हणून भरून घेतली जात असे. त्या बांगडीचा हिशोब केला जात नसे. हिरवा, लाल अश्या ठराविक रंगाच्या बांगड्या त्यावेळी भरल्या जात. आज बांगड्या ‘फॅशन अॅक्सेसरी’ म्हणून वापरत आहेत. त्यांना भरपूर मागणी आहे आणि आज अनेक प्रकारच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत. या व्यवसायाची वाढ वेगाने होत आहे मात्र कामगारांच्या मजुरीत फार वाढ झालेली नाही असेही ते सांगतात.