जवाहिरीच्या शवाचे डीएनए टेस्टिंग करणार नाही अमेरिका
अल कायदाचा नेता आयमान अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याची पुष्टी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केली असली तरी जगातील अन्य देशांकडून त्या संदर्भात काहीही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. याचवेळी अमेरिकेने जवाहिरीच्या मृत्यूच्या पुष्टीसाठी त्याच्या शवाची डीएनए टेस्ट केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्हाईट हाऊस मधील सूत्रांकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या आर ९ एक्स मिसाईलने जवाहिरी ठार झाला असल्याचे अनेक पुरावे मिळाल्याचे म्हटले आहे. शिवाय अनेक सोर्सकडून जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचा दावा केला जात आहे. जवाहिरीच्या मृत्यूबाबत कुणीच शंका घेण्याचे कारण नाही असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अफगाणीस्थानी वेळेनुसार रविवारी सकाळी ६ वा.१८ मिनिटांनी केल्या गेलेल्या या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी ठार झाला. त्यावेळी अमेरिकेत शनिवार रात्रीचे ९वा.४८ मिनिटे झाली होती. गेले सहा महिने, काबुल मध्ये,अमेरिकी गुप्तचर जवाहिरीच्या मागावर होते. २०११ मध्ये लादेन ठार झाल्यावर अल कायदाची सूत्रे जवाहिरीने हाती घेतली होती. लादेन ठार झाल्यावर मात्र अमेरिकेने ओसामा लादेनच्या शवाच्या डीएनए टेस्ट घेतल्या होत्या पण जवाहिरीच्या प्रकरणात डीएनए टेस्टची गरज नाही अशी घोषणा अमेरिकेने केली आहे.
जवाहिरी ठार झाल्यवर बायडेन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जवाहिरीला हुडकून ठार केले गेले आहे असे जाहीर केले होते.