आता २४ तास फडकवता येणार तिरंगा

भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्रवर्षानिमित्त यंदा ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात असून किमान २० कोटी घरांवर तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वर्षी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे. आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक असा हा तिरंगा फडकविताना कुणाही नागरिकाची छाती अभिमानाने फुलून येते. पण हा तिरंगा किंवा आपला राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासंबधी काही नियमावली आहे. तिचे पालन करावे लागते अन्यथा तो गुन्हा मानला जातो.

हे नियम नव्याने फ्लॅगकोड २००२ नुसार तयार केले गेले आहेत आणि २६ जानेवारी २००२ पासून लागू झाले आहेत. त्याचे तीन विभाग आहेत. पहिल्या विभागात तिरंगा संबंधित सर्व माहिती दिली गेली आहे. त्याचा आकार, रंग, तो कसा बनवायचा याची महिती यात आहे. दुसऱ्या विभागात खासगी संघटना, संस्था, सर्वसामान्य नागरिक यांच्या साठी ध्वज फडकविताना पाळायची नियमावली आहे. तिसऱ्या भागात सर्व राज्य, केंद्र सरकारशी संभंधित संस्था यांनी पाळावयाचे नियम आहेत.

आजपर्यंत हाताने कातून काढलेल्या लोकर, कापूस धागा किंवा रेशमी खादी पासून तिरंगा बनत असे पण आता मशीनवर तयार झालेल्या कापडापासून सुद्धा तो बनविला जातो शिवाय पॉलीएस्टर कापडापासून सुद्धा बनविला जातो. घरे, खासगी संस्था व अन्य संस्था सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत अशी तिरंगा फडकविण्याची वेळ पूर्वी होती. पण आता मात्र २४ तास तिरंगा फडकत ठेवता येतो.

तिरंग्याची मान्य लांबी रुंदी ३ बाय दोन आहे. व्हीव्हीआयपी वाहनावर लावायच्या तिरंग्याचा आकार ४५० बाय ३०० मिमी असावा लागतो तर टेबलवर ठेवायचा तिरंगा १५० बाय १०० मिमी आकाराचा असावा लागतो. वर केशरी, मध्ये पांढरा आणि सर्वात खाली हिरवा रंग या पद्धतीने झेंडा हवा.