Sugarcane Price : केंद्राने उसाच्या दरात केली 15 रुपये प्रतिक्विंटल वाढ, शेतकऱ्यांना आता मिळणार 305 रुपये


नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2022-23 साठी उसाच्या भावात प्रति क्विंटल 15 रुपयांनी वाढ केली आहे. साखर कारखानदार आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 305 रुपये देणार आहेत. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने प्रतिक्विंटल 15 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. तो 2022-23 पर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फायदा होणार आहे. यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या 5 लाख कामगारांना आणि साखर कारखान्यांनाही याचा फायदा होणार आहे. ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरू होतो.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला. 2022-23 साठी उसाचा उत्पादन खर्च 162 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. ऊसाची रास्त आणि मोबदला किंमत (FRP) ही किमान किंमत आहे ज्यावर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करावा लागतो. 8 वर्षांत एफआरपीमध्ये 34 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. साखरेचे दर कमी होण्यासाठी सरकारने साखरेचे दर प्रतिकिलो 31 रुपये निश्चित केले आहेत.

18 हजार कोटींची मदत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साखर निर्यात सुलभ करण्यासाठी आणि बफर स्टॉक राखण्यासाठी, इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी साखर कारखान्यांना 18,000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. चालू हंगामात कारखान्यांनी 1.15 लाख कोटी रुपयांचा 3,530 लाख टन ऊस खरेदी केला आहे. 2022-23 मध्ये 3,600 लाख टनांहून अधिक उसाची खरेदी अपेक्षित आहे. याची किंमत 1.20 लाख कोटी रुपये असू शकते.

92,710 कोटी भरले
मंत्रालयाने सांगितले की, गेल्या गळीत हंगामातील सुमारे 92,938 कोटी रुपयांची उसाची किंमत थकबाकी होती, त्यापैकी 92,710 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. आता फक्त 228 कोटी रुपये शिल्लक आहेत. 2021-22 मधील 1.15 लाख कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी 1 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना 1.05 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.