Security Alert : आयबीचा दिल्ली पोलिसांना अलर्ट, 15 ऑगस्टपर्यंत दहशतवादी संघटना लष्कर आणि जैशच्या हल्ल्याची भीती


नवी दिल्ली – केंद्रीय गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना स्वातंत्र्य दिनासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. आयबीच्या अहवालानुसार 15 ऑगस्टपर्यंत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटना कोणताही हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात आयबीने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आयबीने आपल्या 10 पानांच्या अहवालात लष्कर, जैश आणि कट्टरपंथी संघटनांकडून आलेल्या धमक्यांचे वर्णन केले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचाही या अहवालात उल्लेख आहे. दिल्ली पोलिसांना दिलेल्या सूचनांमध्ये 15 ऑगस्ट रोजी कार्यक्रमस्थळी प्रवेशाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे म्हटले आहे. उदयपूर आणि अमरावतीमधील नुकत्याच घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आयबीने कट्टरपंथी गटांवर आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.