5 ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार, भाजपचे 8 आणि शिंदे गटाचे 7 मंत्री घेणार शपथ


मुंबई : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला विस्तार 5 ऑगस्टला म्हणजे उद्या होणार आहे. या दरम्यान भाजपचे एकूण 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे 7 आमदारही सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजभवनातही तयारी सुरू झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितले की, राज्यात पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार कार्यक्षमतेने काम करत आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सध्या राज्य मंत्रिमंडळात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच सदस्य आहेत. दोघांनी 30 जून रोजी शपथ घेतली. शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. लोकाभिमुख असे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत.

एकनाथ शिंदे सरकारने महिनाभरात जारी केले 751 शासकीय आदेश
एकनाथ शिंदे 30 जून रोजी मुख्यमंत्री झाल्यापासून, महाराष्ट्र सरकारने 751 सरकारी आदेश जारी केले आहेत आणि त्यापैकी 100 हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. हे आदेश सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. सरकारी आदेश हा मूलत: एक मंजूरी आदेश असतो, ज्यामध्ये विकास कामांसाठी निधी जारी करण्यास मान्यता दिली जाते.

या वर्षी जूनमध्ये शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत 182 सरकारी आदेश जारी केले होते. यातील बहुतांश आदेश विविध विकास कामांसाठी हजारो कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणाशी संबंधित होते. मात्र, त्यावेळी विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्याला आक्षेप घेतला होता. मात्र आता शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिनाभरात 751 सरकारी आदेश जारी केले आहेत. या सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिंदे आणि फडणवीस हे दोनच सदस्य आहेत.