राष्ट्रवादीच्या नेत्यावर शिंदे-फडणवीस सरकार मेहरबान, देवगिरी बंगल्यात राहणार अजित पवार


मुंबई : महाराष्ट्रात सत्ता बदलली, पद बदलले पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा बंगला अजूनही तसाच राहणार आहे. मलबार हिल येथील देवगिरी बंगला अजित पवार यांना देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोनदा पत्र लिहून देवगिरी बंगला आपल्यासाठी कायम ठेवण्याची विनंती केली होती. यानंतर देवगिरी बंगला अजित पवारांना देण्यात येईल, असे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले.

त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतानाही ते देवगिरी बंगल्यात राहत होते.

1999 पासून या बंगल्यात राहत आहेत अजित पवार
अजित पवार आणि देवगिरी बंगला यांचे नाते अतूट आहे. अजित पवार गेल्या 16 वर्षांहून अधिक काळ या बंगल्यात राहत आहेत. 1999 ते 2014 पर्यंत अजित पवार या बंगल्यात सतत राहत होते. 1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना अजित पवारांना देवगिरी बंगला मिळाला होता.

देवगिरी बंगला भव्य मानला जातो
2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आला होता. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पवारांना हा बंगला पुन्हा मिळाला. मुख्यमंत्री निवास वर्षापेक्षा देवगिरी बंगला भव्य मानला जातो. अजित पवारांना बंगला देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या उदारतेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सागर बंगल्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याची कमान सांभाळणार आहेत.