Putin Girlfriend Blacklisted : पुतीन यांची मैत्रीण अलिना काळ्या यादीत, रशियावर अमेरिकेचे नवे निर्बंध


वॉशिंग्टन – युक्रेनवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. पुतिन यांची कथित मैत्रीण अलिना माराटोव्हना काबाएवा हिला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेने अलिनाचा व्हिसा रद्द केला आहे.

39 वर्षीय काबाएवाचे पुतिन यांच्याशी जवळचे संबंध आहेत. ती रशियन संसदेच्या ड्यूमाच्या माजी सदस्या आणि नॅशनल मीडिया ग्रुपच्या सध्याच्या प्रमुख आहेत. हा गट टेलिव्हिजन, रेडिओ आणि प्रिंट मीडिया संस्थांचा रशियन समर्थक गट आहे.

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, युरोपियन युनियन आणि ब्रिटननेही काबाएवावर निर्बंध लादले आहेत. वरिष्ठ नेता, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि रशियन फेडरेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य असल्याच्या आधारावर काबाएवावर ही कारवाई करण्यात आली आहे.

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशिया, पुतिन, त्यांच्या दोन मुली आणि इतर अनेक रशियन नेत्यांवर निर्बंध लादले आहेत. या नेत्यांवर प्रवास निर्बंधांसोबतच त्यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. काबाएवावर बंदी घालण्यापूर्वी अमेरिकेने पुतिन यांच्या दोन्ही मुली कॅटरिना व्लादिमिरोवना तिखोनोवा आणि मारिया व्लादिमिरोवना वोरोंत्सोवा यांच्यावर निर्बंध लादले होते. अमेरिकेच्या ट्रेझरी मंत्रालयाने आतापर्यंत 893 रशियन नेते आणि अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये रशियाच्या उच्च लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे सर्व व्हिसा जप्त करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी एक निवेदन जारी केले आहे की युक्रेनमधील लाखो लोक हल्ल्यानंतर अडचणींशी झुंज देत आहेत, तर पुतिन आणि त्यांचे सहयोगी चैनीचे जीवन जगत आहेत.

अलिना एका मुलीला देणार आहे जन्म
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन पुन्हा एकदा वडील होणार असल्याची चर्चा आहे. असा दावा केला जात आहे की पुतिन आणि अलिना यांना आधीच दोन मुले आहेत आणि आता ती एका मुलीला जन्म देणार आहे.