ममता मंत्रिमंडळात फेरबदल, जाणून घ्या बाबुल सुप्रियो यांच्यासह कोण-कोण झाले मंत्री


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मंत्रिमंडळात बदल केला. तृणमूलच्या मंत्रिमंडळात नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपमधून टीएमसीमध्ये गेलेले बाबुल सुप्रियो यांचा समावेश आहे.

कोलकात्यात नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये बाबुल सुप्रियो, स्नेहसिस चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा, प्रदीप मजुमदार, तजमुल हुसेन, सत्यजित बर्मन यांचा समावेश आहे. बिरबाह हंसदा आणि बिप्लब रॉय चौधरी यांनी स्वतंत्र प्रभारासह मंत्री म्हणून शपथ घेतली.

खरं तर, सीएम ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच एसएससी घोटाळ्यात अटक झालेल्या पार्थ चॅटर्जीला मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. त्यांच्या उद्योग विभागासह काही महत्त्वाच्या विभागांच्या रिक्त पदांमुळे हा विस्तार-सह-बदल करण्यात आला आहे.

2011 मध्ये टीएमसी सत्तेत आल्यानंतर ममता सरकारचा हा सर्वात मोठा फेरबदल असल्याचे टीएमसीने म्हटले आहे. 2021 मध्ये बंगालमध्ये तिसऱ्यांदा टीएमसीची सत्ता आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार शिक्षक भरती घोटाळ्यात चांगलेच अडकले असताना हा बदल झाला आहे. अटकेनंतर राज्याचे ज्येष्ठ मंत्री पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सध्या ममता सरकारमध्ये 21 कॅबिनेट मंत्री, 10 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि नऊ राज्यमंत्री आहेत. विधानसभेच्या सदस्यसंख्येनुसार राज्यात 44 मंत्री केले जाऊ शकतात.