गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने एटीएसकडे सोपवला, 7 वर्षानंतरही पकडले गेले नाहीत मारेकरी


मुंबई : डावे नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवला आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करत होते. पानसरे यांची फेब्रुवारी 2015 मध्ये कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

महाराष्ट्र एटीएस करणार गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास
पानसरे यांची सून आणि कार्यकर्त्या मेघा पानसरे यांनी उच्च न्यायालयाला महाराष्ट्र सीआयडीऐवजी राज्य एटीएसकडे तपास करण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे हत्येचा तपास राज्य एसआयटीकडून महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग केला आहे.

2015 मध्ये, न्यायालयाच्या आदेशानुसार, महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते. गेल्या सात वर्षांत एसआयटीने या प्रकरणात कोणतीही प्रगती केली नसल्याचा आरोप पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तरीही मारेकरी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आहे. मात्र, काही आरोपी अटकेत आहेत. पण अद्याप खून प्रकरणाचा उलगडा झालेला नाही.

पानसरे यांच्या कुटुंबियांनी प्रकरण हस्तांतरित करावे, या याचिकेवर सीआयडीने सांगितले की, एटीएस ही राज्य सरकारचीही तपास यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तपास सोपविण्यास हरकत नाही.

पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळ्या झाडण्यात आल्या आणि काही दिवसांनी 20 फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका प्रकरणात आरोपींनी चौकशीदरम्यान सचिन अंदुरे आणि विनय पवार हे पानसरे प्रकरणातील कथित शूटर असल्याचे उघड केले होते.