व्हाईट हाऊस मधील अतिमहत्वाची जागा, ‘सिच्युएशन रूम’
अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस मध्ये एक खास जागा आहे ज्याविषयी बाहेर फार माहिती नाही. या जागेला सिच्युएशन रूम असे नाव आहे. सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वा.३५ मिनिटांनी अध्यक्ष बायडेन यांनी अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाल्याची घोषणा केली. पण या मोहिमेचे ब्रीफिंग गुप्तचर यंत्रणा सीआयएने बायडेन यांना जुलै मध्येच केले होते आणि बायडेन यांनी २८ जुलै रोजी ही मोहीम पार पाडण्यास मंजुरी दिली. ही मंजुरी ज्या रूम मध्ये दिली गेली तीच ही सिच्युएशन रूम.
व्हाईट हाऊस ला जगातील बलाढ्य जागा बनविण्यात या ‘सिच्युएशन रूम ‘ चे योगदान मोठे आहे. याच रूम मधून निक्सन ते जॉर्ज बुश ज्युनिअर यांनी अनेक मोहिमांना हिरवा कंदील दाखविला आणि येथेच बसून बराक ओबामा यांनी अल कायदाचा संस्थापक आणि कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेन नेव्ही सील कमांडोकडून ठार करण्यासाठी राबविलेल्या मोहिमेची कारवाई प्रत्यक्ष पाहिली. याच खोलीतून व्हिएतनाम विरुद्ध युद्धाचे आदेश दिले गेले आणि जॉर्ज बुश यांनी २००१ मध्ये अफगाणीस्थानात सैन्य घुसविण्याचे आदेश येथूनच दिले होते.
या रूमला ‘SITROOM’ असे कोडनेम आहे. व्हाईट हाउस मधील ही सर्वात सुरक्षित खोली असून पेंटागॉनने २०२१ मध्ये तेथे अपग्रेडेड सुरक्षा उपकरणे बसविण्यासाठी ४६ दशलक्ष डॉलर्सचे बजेट बनविले होते. या रूमला कमांड सेंटर असेही म्हटले जाते.
अमेरिकेचे ३५ वे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या कल्पनेतून ही रूम साकारली गेली असल्याचे सांगतात. क्युबाचे नेते फिडल कॅस्ट्रो यांना हटविण्यासाठी अमेरिकेन सेनेने ‘बे ऑफ पिग्स मिशन’ राबविले पण ते अपयशी झाल्यामुळे अमेरिकेची जगभरात नाचक्की झाली. तेव्हाच केनेडी यांनी अशी एक जागा हवी जेथे मोहीम राबविली जात असतानाची प्रत्यक्ष परिस्थिती समजू शकेल अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा व्हाईट हाऊसच्या बेसमेंट मध्ये वेस्ट विंगला ५ हजार चौ.फुट जागेत सात खोल्याची ही जागा तयार केली गेली. गुप्तचर विभागाने मिळविलेली माहिती येथेच अध्यक्षांना दिली जाते आणि मोठ्या मिशन साठी अध्यक्ष येथूनच मंजुरी देतात. या ठिकाणी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असून स्वतंत्र स्टाफ आहे. येथे ३० वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात.