या कंपनीला हवेत चीफ कॅन्डी ऑफिसर, वय हवे किमान ५ वर्षे
नोकरी आरामदायी हवी, पगार भरपूर हवा आणि घरी बसल्या बसल्या सुद्धा हवे तेव्हाच काम करण्याची मुभा हवी असे अनेकांचे स्वप्न असू शकते आणि हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची सुतराम शक्यता नाही यांची खात्री अनेकांना असू शकते. पण कॅनडाच्या कॅन्डी फनहाउस कंपनीत मात्र हे स्वप्न सत्यात उतरण्याची मोठी शक्यता आहे. या कंपनीने त्यांना ‘चीफ कॅन्डी ऑफिसर’ हवेत अशी जाहिरात केली असून येथे वर्षभर फक्त कॅन्डी खायचे काम करायचे आहे. त्यासाठी कंपनीने वर्षाला १ लाख डॉलर्स म्हणजे म्हणजे सुमारे ७० लाख रुपये पगार देऊ केला आहे.
कॅन्डी फनहाउस ही ऑनलाईन रिटेल कंपनी आहे. त्यांना असा अधिकारी हवाय ज्याला कॅन्डीज आवडतात. त्याला अन्य सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहेत. म्हणजे कॅन्डी खाण्यासाठी म्हणजे जॉब करण्यासाठी कंपनीत येण्याची गरज नाही. घरी बसून हे काम करता येणार आहे. त्याने फक्त कॅन्डी, चॉकलेट टेस्ट करायची आणि त्याचा योग्य रिव्ह्यू द्यायचा. या पोस्ट साठी उमेदवाराचे किमान वय ५ वर्षे ते पुढे कितीही चालणार आहे.
या जागेसाठी ३१ ऑगस्ट २०२२ पूर्वी अर्ज करायचे आहेत. पाच वर्षाच्या मुलांनी आईवडिलांच्या परवानगीने अर्ज करायचा आहे. कंपनीचे सीईओ जमील हेजाजी सांगतात, आमच्या जाहिरातीला खूप प्रतिसाद मिळतो आहे. आत्ताच अनेक अर्ज या जागेसाठी आले आहेत आणि आईवडिलांनी त्यांच्या मुलांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.