असे आहे भारताच्या उपराष्ट्रपतींचे निवासस्थान

भारताच्या राष्ट्रपती भवनची चर्चा अनेक वेळा होते पण देशाचे उपराष्ट्रपती जेथे राहतात त्या बंगल्याची चर्चा फारशी होत नाही. देशात उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी येत्या ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. सध्याच्या उपराष्ट्रपतींची मुदत १० ऑगस्ट रोजी संपत आहे आणि मग नवे उपराष्ट्रपती या बंगल्यात राहायला येतील. गेली ६० वर्षे हाच बंगला उपराष्ट्रपतींचे निवासस्थान म्हणून वापरात आहे. मौलाना अबुल कलम आझाद रोडवर हा बंगला असून त्याचे नाव उपराष्ट्रपती भवन असेच आहे.

नव्या सेन्ट्रल व्हिस्टा मध्ये १५ एकर जागेत नवे उपराष्ट्रपती निवास बांधण्याचे काम सुरु आहे. ते घर तयार झाल्यावर उपराष्ट्रपती तेथे राहायला जातील असे समजते. मे १९६२ मध्ये नवी दिल्लीतील मौलाना आझाद रोडवरील बंगला नंबर ६ उपराष्ट्रपतींचे निवासस्थान म्हणून ठरविला गेला. भारताचे स्वतंत्रता सेनानी, शिक्षणतज्ञ मौलाना आझाद हेच या घरात १९४७ ते १९५८ पर्यंत वास्तव्यास होते. तेव्हा हा रस्ता किंग एडवर्ड रोड होता. पण आझाद यांच्या मृत्यूनंतर त्याचे नामकरण मौलाना आझाद रोड केले गेले.

हे निवासस्थान ६.४८ एकर जमिनीवर आहे. या बंगल्यात सर्वाधिक काळ वास्तव्य करण्याची संधी हमीद अन्सारी यांना मिळाली कारण ते दोन वेळा उपराष्ट्रपती होते. त्यापूर्वी राधाकृष्णन हेही दोन वेळा उपराष्ट्रपती होते पण ते या बंगल्यात राहिले नव्हते कारण त्यावेळी येथे मौलाना आझाद यांचे वास्तव्य होते. १९६२ मध्ये राधाकृष्णन राष्ट्रपती बनले आणि राष्ट्रपती भवनात राहायला गेले होते.

या बंगल्याच्या आवारात एक छोटी मशीद आहे आणि नंतर येथे एक मंदिर बांधले गेले आहे. माजी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती के आर नारायणन यांनी या बंगल्यात म.गांधी यांची दोन पेंटिंग लावली आहेत.