रात्री 10 वाजेपर्यंत चौकशी, वकिलाला भेटण्याची परवानगी, औषधांकडे लक्ष, संजय राऊत 4 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत


मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे. ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी पुरेशी असल्याचे सांगितले. राऊत यांची प्रकृती लक्षात घेऊन कोठडीदरम्यान रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्याऐवजी त्यांना थोडी विश्रांती दिली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. ईडीच्या कोठडीदरम्यान राऊत आपल्या वकिलाला भेटू शकणार आहेत. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत त्यांची चौकशी होऊ शकते. तसेच त्यांच्या औषधांचीही काळजी घ्यावी लागेल. ईडीने न्यायालयात सांगितले की, राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुन्ह्यातून थेट पैसे मिळाले. वारंवार समन्स बजावूनही राऊत हजर होत नसून तपासात सहकार्य करत नसल्याचेही ईडीने न्यायालयाला सांगितले.

त्याच वेळी, राऊत यांच्यावतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, आरोप अस्पष्ट आहेत आणि ते राजकीय सूडबुद्धीने केले गेले आहेत. ते म्हणाले की, राऊत हे हृदयाचे रुग्ण असून ते विविध आजारांनी त्रस्त आहेत. सहा तासांच्या चौकशीनंतर रविवारी राऊत यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली. यादरम्यान मुंबई पोलीस सतर्क राहिले. क्यूआरटी, आरएएफ आणि दंगलविरोधी पथकासह स्थानिक पोलिस परिस्थिती हाताळण्यात गुंतले होते.

राऊत यांचा युक्तिवाद
रिमांडच्या अर्जात केलेले सर्व आरोप अस्पष्ट आहेत. राजकीय सूडबुद्धीने ही अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. मग इतके दिवस कारवाई का झाली नाही?

ईडीचा युक्तिवाद
राऊत यांचा थेट मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग आहे. राऊत यांच्या कुटुंबियांच्या खात्यात 1.60 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. या रकमेतून अलिबागमध्ये भूखंड खरेदी करण्यात आला. तीन वेळा समन्स बजावल्यानंतरही ते एकदाच एजन्सीसमोर हजर झाले. पुरावे आणि महत्त्वाच्या साक्षीदारांशी छेडछाड करण्याचाही प्रयत्न केला.