राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्या वक्तव्याबद्दल मागितली माफी


मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी हाकलवले, तर येथे एक पैसाही उरणार नाही, असे अंधेरीतील एका कार्यक्रमात ते म्हणाले होते. या विधानाबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना मोठ्या रोषाला समोर जावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना असे वक्तव्य करू नये, असे म्हटले होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे. त्यावर लिहिले होते, कदाचित 29 जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात माझ्याकडून चूक झाली असावी.

‘विकासात सर्वांचे योगदान’
पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या विकासात प्रत्येकाचे विशेष योगदान आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, तीन वर्षांत मला महाराष्ट्रातील जनतेचे अपार प्रेम मिळाले, पण त्या भाषणात माझ्याकडून चुकून काही चूक झाली असेल, तर ही चूक महाराष्ट्राचा अवमान मानण्याची कल्पनाही करता येणार नाही.

‘माफ करून आपले विशाल हृदय दाखवा’
कोश्यारी म्हणाले, आपल्या या नम्र राज्य सेवकाला क्षमा करून आपले विशाल हृदय दाखवा.’ राज्यपालांचे हे वक्तव्य मराठी अभिमानावर घाव घालणारे असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. त्याचवेळी राज्यपालांनी संविधानाच्या कक्षेत राहून बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.