35 वर्षांनंतर तेलगू चित्रपटात काम करणार अनुपम खेर, रवी तेजासोबत पॅन इंडियाचा धमाका


बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या 528व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे, ज्यामध्ये अनुपम खेर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल निर्मित, ‘टायगर नागेश्वर राव’ तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुपम खेर 35 वर्षांनंतर तेलुगू चित्रपटात काम करत आहेत. याआधी त्यांनी 1987 मध्ये आलेल्या ‘त्रिमुर्तुलु’मध्ये डॉनची भूमिका साकारली होती.

कशाबद्दल आहे ‘टायगर नागेश्वर राव’ ?
‘टायगर नागेश्वर राव’ हा कुख्यात चोरावर आधारित बायोपिक आहे. हा चित्रपट 70 च्या दशकातील आहे. स्टुअर्टपुरम नावाच्या गावात हे शूटिंग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अभिनेता रवी तेजाची बॉडी लँग्वेज, डिक्शन आणि गेटअप पूर्णपणे वेगळा असणार आहे. अभिनेत्याचा हा यापूर्वी कधीही न पाहिलेला अवतार असणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर आणि रवी तेजा यांच्याशिवाय नुपूर सेनन आणि गायत्री भारद्वाज मुख्य भूमिकेत आहेत.