काबूल – अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी या दहशतवाद्याचा अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात खात्मा केला आहे. 2011 मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर अल-जवाहिरीला त्याची कमान देण्यात आली होती. दहशतवादी जवाहिरीच्या मृत्यूबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी माझ्या सूचनेनुसार अफगाणिस्तानातील काबुलमध्ये यशस्वी ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी मारला गेला. 11 नोव्हेंबर 2001 च्या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. जाणून घेऊया अल कायदा कशी चालवतो आहे दहशतीची फॅक्टरी?
Al-Qaeda : दहशतवाद्यांची फॅक्टरी ‘अल कायदा’, किती आहेत लढवय्ये, किती हे मालमत्ता, जाणून घ्या येथे सर्व काही
अल कायदा म्हणजे काय?
अल कायदा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. त्याची स्थापना 1988 मध्ये ओसामा बिन लादेन आणि अब्दुल्ला आझम या दहशतवाद्यांनी केली होती. सोव्हिएत सैनिकांनी अफगाणिस्तानात प्रवेश केल्यावर ही संघटना निर्माण झाली होती, असे म्हणतात. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO), युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड किंगडम, भारत, रशिया आणि अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी गट म्हणून लेबल केले आहे.
किती मालमत्ता आणि किती लढवय्ये
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-कायदामध्ये 20 हजारांहून अधिक दहशतवादी आहेत आणि ही संघटना 60-65 देशांमध्ये अस्तित्वात आहे. अल-कायदाच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले, तर अल-कायदाकडे 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1200 ते 1500 कोटी रुपयांचा निधी आहे. ही संघटना इतर देशांमध्ये दहशत पसरवण्यासाठी आणि सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर करते.
कोन होता ओसामा बिन लादेन
अल कायदाची सुरुवात ओसामा-बिन-लादेनने केली होती. याचा जन्म 10 मार्च 1957 रोजी सौदी अरेबियातील रियाध शहरात झाला. ओसामाचे वडील मोहम्मद अवाद बिन लादेन हे एक श्रीमंत बांधकाम व्यावसायिक होते. अवाद बिन लादेनला 52 मुले होती आणि ओसामा 17 व्या क्रमांकाचा मुलगा होता. 1968 मध्ये वडिलांचे निधन झाले. ओसामा तेव्हा 11 वर्षांचा होता आणि त्याच्याकडे 80 दशलक्ष डॉलर्सची रक्कम होती. त्या काळात तो शाळेत शिकत होता. नंतर त्याने सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला अझीझ विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.
कोण होता अल-जवाहिरी ज्याचा अमेरिकेने शनिवारी रात्री केला खात्मा
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अयमान अल-जवाहिरीने अल-कायदा प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. अयमान अल-जवाहिरी 71 वर्षांचा होता. ओसामाच्या मृत्यूनंतर भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दहशतवादी हल्लेही केले. त्याचा जन्म 1951 मध्ये गिझा येथे झाला. जवाहरी याने वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले होते. सध्या जगभरातील अनेक एजन्सी त्याचा शोध घेत होते. अल कायदाला सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत या देशांकडून निधी मिळतो, असे म्हटले जाते.
अशा प्रकारे झाली अल-जवाहिरी आणि ओसामा यांची भेट
सौदीमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत असताना त्याची अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनशी भेट झाली. त्यानंतर दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली. बिन लादेन आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी पाकिस्तानातील पेशावर येथे गेला होता आणि यावेळी अल-जवाहिरीही त्याच्यासोबत होता. येथून दोन दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले. यानंतर 2001 मध्ये अल-जवाहिरीने आपली संघटना अल-कायदामध्ये विलीन केली.
दहशतवादी कसा बनला लादेन ?
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ओसामा बिन लादेन कट्टर इस्लामी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. त्यानंतर मुजाहिदीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लढवय्यांना मदत करण्यासाठी तो 1979 मध्ये अफगाणिस्तानला गेला. बिन लादेन एका गटाचा मुख्य आर्थिक पाठीराखा बनला, जो नंतर अल-कायदाचा म्होरक्या बनला. 1989 मध्ये अफगाणिस्तानातील सोव्हिएत संघाच्या माघारानंतर लादेन त्याच्या बांधकाम कंपनीत काम करण्यासाठी सौदी अरेबियात परतला. येथे त्याने अफगाण युद्धात मदत करण्यासाठी निधी उभारण्यास सुरुवात केली. येथेच अल कायदा हा जागतिक गट बनला. त्याचे सदस्य 35 ते 60 देशात होते.
1991 मध्ये जेव्हा अमेरिकन सैन्याने इराकी सैन्याला कुवेतमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध सुरू केले, तेव्हा लादेनने अमेरिकन सैन्याविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यानंतर त्याला सौदी अरेबियातून हाकलण्यात आले. सौदी अरेबियाने त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे नागरिकत्व परत घेतले. त्यानंतर त्याने सुदानमध्ये आश्रय घेतला.
अल कायदाने एकामागून एक अनेक केले दहशतवादी हल्ले
1993 मध्ये ओसामा बिन लादेनच्या दहशतवाद्यांनी पहिल्यांदा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जखमी झाले. या प्रकरणात सहा मुस्लिम कट्टरतावाद्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये रियाधमध्ये एका इमारतीसमोर बॉम्बस्फोट झाला होता. या इमारतीत अमेरिकन सैन्याशी संबंधित लोक काम करायचे. या हल्ल्यात पाच अमेरिकन आणि दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात 60 हून अधिक लोक जखमी झाले होते.
अल कायदाने केला अमेरिकन दूतावासावर हल्ला
1995 मध्ये, नैरोबी आणि दार एस सलाम, टांझानिया येथील अमेरिकन दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 224 जणांचा मृत्यू झाला होता. 1996 मध्ये सुदानने अमेरिकेच्या दबावाखाली लादेनची हकालपट्टी केली. यानंतर लादेन आपल्या 10 मुले आणि तीन पत्नींसह अफगाणिस्तानला पोहोचला. येथे त्याने अमेरिकन सैन्याविरुद्ध जिहाद घोषित केला. 20 ऑगस्ट 1998 रोजी दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तान आणि सुदानमधील लादेनच्या प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला. या मध्ये 20 दहशतवादी मारले गेले. मात्र, लादेन निघून गेला होता.
जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
2001 मध्ये अल-कायदाने जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. 11 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला केला. यामध्ये तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा झपाट्याने शोध सुरू केला. अमेरिकेने त्याला अफगाणिस्तानच्या कानाकोपऱ्यात शोधले, पण तो सापडला नाही. अमेरिकेतून लपून बसलेल्या ओसामाने याच दरम्यान अनेक ऑडिओ टेप्स प्रसिद्ध करून जगभरातील मुस्लिमांना जिहाद करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली.
ठार झाला ओसामा बिन लादेन
2 मे 2011 रोजी अखेर अमेरिकेला मोठे यश मिळाले. ओसामा पाकिस्तानात लपला असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली. त्यानंतर अमेरिकेच्या वेगवान सैन्याने इस्लामाबादजवळील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ओसामाचा खात्मा केला.