5G In India : याच महिन्यात लाँच होणार Jio 5G, अंबानी म्हणाले – साजरा करणार ‘आझादी का अमृत महोत्सव’


नवी दिल्ली – रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव जिंकला आहे. 5G लिलाव एकूण 1,50,173 कोटी रुपयांचा झाला आहे, ज्यापैकी एकट्या Jio ने 88,078 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहे, म्हणजेच 50 टक्क्यांहून अधिक स्पेक्ट्रम Jio च्या ताब्यात आहे. 5G स्पेक्ट्रम अंतर्गत 51236 Mhz स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात आला आहे. स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ इन्फोकॉमने सर्वाधिक बोली लावली. रिलायन्सने एकूण 24,740 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. रिलायन्सने 700Mhz, 800Mhz, 1800Mhz, 3300Mhz आणि 26Ghz स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे.

15 ऑगस्टला लॉन्च होऊ शकते Jio चे 5G नेटवर्क
देशात 5G नेटवर्क सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. जिओ आपल्या ग्राहकांना 5G भेट देणारे पहिले असेल अशी अपेक्षा आहे. Jio ची 5G सेवा 15 ऑगस्टला लॉन्च होऊ शकते. असे म्हटले जात आहे कारण रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, आम्ही 5G लाँच करून आझादीचा अमृत महोत्सव साजरा करू. Jio ने 22 सर्कलसाठी 5G स्पेक्ट्रम विकत घेतला आहे.

अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत जगातील एक मोठी आर्थिक शक्ती बनेल यावर आमचा नेहमीच विश्वास आहे. याच व्हिजन आणि खात्रीने जिओला जन्म दिला. Jio च्या 4G रोलआउटचा वेग, स्केल आणि सामाजिक प्रभाव जगात अतुलनीय आहे आणि आता Jio भारतात 5G तंत्रज्ञानामध्ये आघाडी घेण्यास सज्ज आहे.

ते पुढे म्हणाले, आम्ही भारतभर 5G रोलआउटसह ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करू. जिओ जागतिक दर्जाची, परवडणारी 5G सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सेवा, प्लॅटफॉर्म आणि उपाय प्रदान करू जे भारताची डिजिटल क्रांती घडवून आणतील, विशेषत: शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये. माननीय पंतप्रधानांचे डिजिटल इंडिया मिशन साकार करण्यात हे आमचे पुढचे अभिमानास्पद योगदान आहे.

5G स्पेक्ट्रम खरेदी करण्यात दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल
5G स्पेक्ट्रमचा लिलाव आता संपला असून यामध्ये जिओने सर्वाधिक स्पेक्ट्रम जिंकला आहे. भारती एअरटेलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारती एअरटेलने 19867 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. त्याच वेळी, व्होडाफोन-आयडियाने 6228 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. टेलिकम्युनिकेशनच्या जगात प्रथमच प्रवेश करत असलेल्या अदानी डेटा नेटवर्कने 26Ghz एअरवेव्ह स्पेक्ट्रमसाठी बोली लावून 400Mhz स्पेक्ट्रम विकत घेतला आहे.