फक्त नागपंचमी दिवशी या मंदिराचे उघडतात दरवाजे

आज देशभरात नागपंचमी उत्साहात साजरी होत आहे. उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिराच्या डोक्यावर असलेल्या नागचंद्रेश्वर मंदिराचे अनोखेपण असे कि या मंदिराचे दरवाजे फक्त नागपंचमी साठी वर्षातून एकदाच उघडले जातात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता हे द्वार उघडते आणि महंतांच्या हस्ते साग्रसंगीत पूजा झाल्यावर नागपंचमीच्या रात्री १२ पर्यंत सर्वसामान्य भाविक येथे नागचंद्रेश्वर चे दर्शन घेऊ शकतात. १२ नंतर दरवाजे बंद झाले कि पुन्हा पुढच्या नागपंचमीला द्वार उघडले जाते.

या मंदिरात शेषनागाच्या आसनावर शिवपार्वती त्यांच्या संपूर्ण परिवारासह विराजमान आहेत. गर्भगृहात भगवान नागचंद्रेश्वर लिंगरुपात आहेत. जगात असे मंदिर फक्त येथेच आहे. नागपंचमी दिवशी शिव आणि अलंकार नागदेवता मूर्ती लिंगरुपात असे दर्शन येथे होते. येथे भेट देणाऱ्या भाविकांना कालसर्प दोष राहत नाही अशी भावना आहे. या मंदिराची कथा अशी सांगतात कि येथे तक्षक नागाला भोलेशंकरांनी अमरत्वाचे वरदान दिले. नागपंचमी दिवशी तक्षक नाग येथे येतो अशी श्रद्धा आहे. भगवान शिवाच्या गळयाला, हातापायांना वेढून तक्षक बसला आहे.

येथे नारळ वाहून यात्रा पूर्ण झाल्यावर मातीचे घोडे वाहण्याची प्रथा आहे. उज्जैन हे मंदिर नगरी म्हणून ओळखले जाते. येथे प्रत्येक गल्लीत किमान एक मंदिर आहे. महाकाळेश्वर मंदिराच्या तिसऱ्या भागात नागचंद्रेश्वर मंदिर असून येथील मूर्ती नेपाळ मधून आणली गेली होती असे म्हणतात. ही मूर्ती ११ व्या शतकातली आहे. येथे भगवान भोलेनाथ त्यांच्या पूर्ण परिवारासह आहेत.