अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी ठार, इन्साफ झाला- बायडेन

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९/११ चा भयानक हल्ला करून ३ हजाराहून अधिक नागरिकांचा जीव घेणाऱ्या अल कायदा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन मिसाईल हल्ल्यात ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राय्ध्यक्ष जो बायडेन यांनी जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ते म्हणाले ओसामा बिन लादेन पासून सुरु झालेला हा सिलसिला आता पूर्ण झाला असून अमेरिकेने न्याय केला आहे. आम्हाला शत्रूला सांगायचे आहे, तुम्ही कुठेही लपा, आम्ही तुम्हाला ठार मारणारच असेही बायडेन यावेळी म्हणाले.

अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयए ला सहा महिन्यापूर्वीच जवाहिरी काबुल मध्ये असल्याची खबर मिळाली होती. बायडेन यांनी आदेश देताच जवाहिरी आश्रयास असलेल्या घरावर रिपर ड्रोनच्या हेलफायर मिसाईलने हल्ला केला. जवाहिरी याला घराच्या गच्चीत वारंवार येण्याची सवय होती तीच त्याला भारी पडली असे सांगितले जात आहे. या हल्ल्यात जवाहिरीबरोबरच सिराजुद्दिन हक्कानीचा मुलगा आणि जावई हेही ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

ओसामा बिन लादेनला पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घुसून अमेरिकेच्या सील कमांडोनी ठार केल्यावर अल कायदाची सूत्रे अल जवाहिरीच्या हाती आली होती. ७१ वर्षाच्या जवाहिरीने लादेनच्या मृत्यूनंतर ११ वर्षे अल कायदाचे पुढारीपण केले. तो सध्या अफगाणिस्थानची राजधानी कबूल मध्ये एका सुरक्षित स्थळी आश्रयास होता. अगोदर तो पाकिस्तान मध्ये लपला होता पण अफगाणीस्थानात तालिबान सरकार आल्यावर तो काबुल मध्ये आला. तालिबानी गृहमंत्री आणि कुख्यात दहशतवादी सिराजुद्दिन हक्कानी याने त्याच्या स्वतःच्या अतिसुरक्षित घरात जवाहिरी आणि त्याच्या परिवाराला आश्रय दिला होता. जवाहिरी सतत व्हिडीओ जारी करून जगाला धमक्या देत होता. त्याच्यावर अमेरिकेने कोट्यावधी डॉलर्सचे बक्षीस लावले होते.जवाहिरी ओसामा बिन लादेन याचा खासगी डॉक्टर सुद्धा होता.

जवाहिरी काबुल मध्ये नक्की कुठे लपला आहे हे एकदा स्पष्ट झाल्यावर गेल्या शुक्रवारी बायडेन यांनी हल्ला करायचे आदेश दिले आणि त्यानंतर ड्रोन मिसाईलचा अचूक हल्ला करून जवाहिरीचे काम तमाम करण्यात आले. यावेळी एकही अमेरिकन सैनिक अफगाणिस्थान मध्ये नव्हता. सत्तेवर असलेल्या तालिबानला अंधारात ठेऊन हा हल्ला केला गेला. गेली अनेक दशके अमेरिकन नागरिकांच्या हत्या केल्या जात असून त्याचा मास्टरमाइंड हा जवाहिरीच होता असे म्हटले जाते.