१० हजार जिहादी, १५० दशलक्ष डॉलर्सचे फंड, असा चालतो अल कायदाचा कारभार
अमेरिकेने अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी याला अफगाणिस्थानची राजधानी काबुल येथील अति सुरक्षित घरात मिसाईल हल्ल्यात ठार केल्यामुळे अल कायदा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा अजून किती मजबूत आहे आणि लादेनच्या मागे ती कसे काम करते याविषयी अनेक बातम्या येत होत्या. लादेनचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या अल जवाहिरी कडे या संघटनेची सूत्रे होती.
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या ९/११ च्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर अल कायदा जगभर चर्चेत आली. ओसामा बिन लादेन याने अब्दुल्ला आझम यांच्या सहकार्याने १९८८ मध्ये या संघटनेची स्थापना केली होती. रशिया अफगाणिस्थान मध्ये घुसली तो हा सुमार आहे. रशियापासून अफगाणींचा बचाव आणि अरबी लोकांना संरक्षण देण्यसाठी लादेन पाकिस्तानात पेशावर येथे आला होता. सौदी कडून या संघटनेला तो आर्थिक मदत देत असे. सुरवातीला या संघटनेचे नाव ‘द बेस’ होते त्याचेच पुढे अल कायदा झाले.
जगातील अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. या संघटनेत १० ते १५ हजार लढवय्ये आहेत आणि जगातील ६०-६५ देशात तिचे अस्तित्व आहे. या संघटनेकडे १५० दशलक्ष डॉलर्स फंड असून त्याचा वापर दहशतवादी हल्ले, प्रशिक्षण आणि युवकाचा ब्रेन वॉश करून त्यांना जिहादी बनविणे यासाठी होतो. लादेन व्यवसायाने इंजिनीअर होता आणि त्यांच्या वडिलांचा बांधकाम व्यवसाय होता. १९९३ मध्ये त्याने पहिला दहशतवादी हल्ला केला तो वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच. त्यात सहा अमेरिकन ठार झाले होते.
या संघटनेने अमेरिकन लोकांना लक्ष्य बनविले होते आणि अमेरिकन दुतावासांवर बॉम्बस्फोट करून २२४ अमेरिकन लोकाचा जीव घेतला होता. १९९६ मध्ये लादेन अफगाणिस्थान मध्ये आला आणि त्याने अमेरिकेविरुद्ध जिहादची घोषणा केली होती.
—————-