फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलाव- सरकारी खजिन्यात दीड लाख कोटी जमा

फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव सातव्या दिवशी पूर्ण झाल्यावर सरकारने १,५०,१७३ कोटींची कमाई त्यातून केल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या ७७८१५ कोटीच्या फोर जी स्पेक्ट्रम पेक्षा ही रक्कम जवळजवळ दुप्पट आहे. लिलाव बोलीमध्ये रिलायंस जिओ आघाडीवर होती. फाईव्ह जी मुळे अत्याधिक वेगवान इंटरनेट संपर्क सेवा मिळणार आहे.

२०१० मध्ये थ्री जी स्पेक्ट्रम लिलावात सरकारला ५०९६८.३७ कोटी रुपये मिळाले होते. रिलायंस जिओने फोर जीच्या तुलनेत १० पट अधिक वेगवान संपर्क देणाऱ्या रेडीओ लहरीसाठी सर्वाधिक ८८०७८ कोटींची बोली लावली. त्या पाठोपाठ भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने बोली लावल्या. अदानी समूहाने प्रायव्हेट टेलिकॉम नेटवर्क स्थापित करण्यासाठी २६ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे.

सरकारने १० बँड स्पेक्ट्रम साठी लिलाव जाहीर केले होते मात्र ६००,८००,२३०० हर्ट्झसाठी बोली मिळाल्या नाहीत. एकूण लिलावात २/३ बोली फाईव्ह जी ३३०० मेगाहर्ट्झ आणि २६ गिगा हर्ट्झच्या होत्या. फाईव्ह जी वेगवान आणि विना अडथळा नेटसेवा असून त्याचा फायदा युजर्सना होणार आहे. १० जीबीपीएस डाऊनलोड स्पीड यात मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण एचडी फिल्म काही सेकंदात डाऊन लोड होऊ शकते.